BREAKING!  मागणी १० कोटींची ; मिळाले दोनच कोटी!! मलकापूर बस स्टँडचा प्रश्न ऐरणीवर!

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जुनी व जीर्ण झालेल्या मलकापूर बस स्थानकसाठी नुकतेच २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही बातमी वरकरणी गुड न्यूज वाटत असली तरी हा निधी अत्यंत तोकडा असून वाढीव निधीसाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. 

सेनेतील महाबंड, सत्तांतर, मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानपरिषद निवडणूक प्रकरणी संबंधित  आमदाराविरुद्ध कारवाई करण्याची करण्यात आलेली मागणी या धामधुमीत  हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी नागपूर येथील आर्किटेक्ट अशफाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली.  त्यांच्यावर नियोजित कामाचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याची जवाबदारी सोपविण्यात आल्याचे या सूत्राने स्पष्ट केले. 

आमदारांचा पाठपुरावा आवश्यक

 मात्र हा निधी तोकडा असल्याचे चित्र आहे. प्राप्त माहितीनुसार बुलडाणा मार्गावरील मलकापूर बस स्थानकाचे बांधकाम १९८५ मध्ये पूर्ण झाले होते.  ही इमारत ३७ वर्षे जुनी झाली आहे. मात्र दरम्यानच्या काळात डागडुजी करण्यात न आल्याने ही इमारत आता जीर्ण झाली आहे. यामुळे ही इमारत पाडून अद्ययावत सुसज्ज इमारत उभारणे काळाची गरज ठरली आहे. मागील काळात त्या दृष्टीने कमीअधिक १० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र दीर्घ काळ लाल फितशाहित अडकल्यावर नुकतेच २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे . ही बाब लक्षात घेता आमदार राजेश एकडे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी वाढीव निधीसाठी पाठपुरावा करणे काळाची गरज ठरली आहे.