खोडसाळपणा! शेजारच्या शेतवाल्याने कहरच केला..!!; शेतकरी महिलेची जळगाव जामोद पोलिसांत धाव

 
जळगाव जामाेद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेजारील शेतवाल्याने धुरा पेटवल्याने शेतकरी कुटुंबाच्या शेतातील तुरीच्या पेंड्या आणि ठिबकच्या नळ्या जळून गेल्या. यात २३ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मुरादाबाद (ता. जळगाव जामोद) शिवारात २२ मार्चला सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

सौ. शारदा गणेश गटमने (२८, रा. उटी, ता. जळगाव जामोद) यांनी पतीसह येऊन जळगाव जामाेद पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी अनिल रणछोडदास राठी (रा. वडशिंगी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राठी आणि गटमने यांचे शेत शेजारी शेजारी आहेत.

गटमने यांच्याकडे दोन एकर शेती असून, शेजारील नाल्याला लागून राठीचे शेत आहे. २२ मार्चला राठीने शेताचा धुरा जाळला. त्‍यामुळे सौ. शारदा यांनी त्‍यांना सांगितले, की मागच्या वर्षी तुम्ही धुरा जाळला तेव्हा आमचा गहू पेटला होता. त्‍यामुळे आता काळजी घ्या. मात्र या बोलण्याकडे राठीने दुर्लक्ष केले. त्‍यामुळे आग पसरत जाऊन गटमने यांच्या शेतात आली.

त्‍यांच्या शेतातील तुरीच्या पेंड्या आणि ठिबकच्या नळ्या जळू लागल्या. सौ. शारदा यांनी राठींना ही बाब सांगून आग विझविण्यासाठी पतीसह धावल्या. राठी मात्र मोटारसायकल घेऊन निघून गेला. या आगीत तुरीच्या पेंड्या (किंमत १८ हजार रुपये), ठिबकच्या नळ्या सात बंडल (किंमत ५ हजार रुपये) असे एकूण २३ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्‍यामुळे सौ. गटमने यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.