अरेच्‍चा... पालिकेत कर भरण्यासाठी आणली ५४ हजारांची चिल्लर!; पैसे मोजता मोजता कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ, शेवटी लढवली ही शक्कल!, खामगावमधील प्रकार

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील एका दृश्याची प्रचिती काल, १० मार्चला सायंकाळी खामगाव नगरपालिकेत आली. या चित्रपटात मकरंद अनासपुरे निवडणुकीसाठी २५ हजार रुपयांची अनामत रक्कम चिल्लर स्वरुपात भरायला घेऊन येतो आणि हे पैसे मोजत मोजता निवडणूक विभागातील अधिकारी अक्षरशः घामाने चिंब होतात... तोच फंडा एका चिप्स व्यावसायिकाने अंमलात आणला. मालमत्ता कर भरा असा तगादा लावल्याने त्‍यांनी ४ कॅरेटमधून ५४ हजार रुपयांची चिल्लर नगर पालिकेच्या कर विभागात आणली. यामुळे कर विभागात तारांबळ उडाली. अखेर तांत्रिक कारणास्तव २० हजार रुपयांची चिल्लर स्वीकारून उरलेली रक्कम टप्याटप्प्याने भरण्याचे सांगण्यात आले.

मार्चएंड असल्याने नगर पालिकेकडून सध्या मालमत्ता कराची वसुली सुरू आहे. त्यासाठी खामगाव नगरपालिकेच्या कर विभागाने ७ वेगवेगळ्या पथकांची निर्मिती केली आहे. खामगाव शहरातील चिप्स विक्रीचा व्यवसाय करणारे मालमत्ताधारक जगदीश कल्याणदास बोहरा यांच्याकडे नगर पालिकेची ९३ हजार ८२३ रुपयांची थकबाकी असल्याची नोटीस नगर पालिकेने त्यांना पाठवली होती. पालिकेच्या वसुली पथकाने ९ मार्च रोजी बोहरा यांच्याकडे जाऊन त्यांना तातडीने कराचा भरणा करायला सांगितले होते.

त्यामुळे काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास बोहरा हे पालिकेत ४ कॅरेटमध्ये ५४ हजार रुपयांची चिल्लर भरून आले. त्यात १ रुपया, २ रुपये, ५ रुपये व १० रुपयांची नाणी होती. हा सर्व प्रकार पाहून कर विभागातील अधिकारी काही काळ चक्रावून गेले. अखेर तांत्रिक अडचणींमुळे केवळ २० हजार रुपयांची नाणी स्वीकारण्यास पालिकेने अनुकूलता दर्शवली. त्यातही जास्तीत जास्त १० रुपयांची नाणी पालिकेकडून स्वीकारण्यात आली. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याची सूचना करून अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली. या सर्व प्रकारामुळे करवसुलीच्या मोहिमेत मात्र खोळंबा निर्माण झाला होता.