अंगणात बाजेवर झोपलेल्या वृद्धाच्या पोटात खुपसला चाकू!; खामगाव तालुक्‍यातील खळबळजनक घटना

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : क्षुल्लक कारणावरून अंगणात झोपलेल्या वृद्धाच्या पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी केल्याची घटना खामगाव तालुक्यातील कोलारी गावात काल, १ एप्रिलच्या मध्यरात्री घडली. खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी जखमी वृद्धाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून ४० वर्षीय हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील गुलाबराव कोरडे (४०, रा. कोलारी) असे हल्लेखोराचे नाव आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील कोरडेला दारूचे व्यसन आहे. तो नशेत नेहमी शेजारच्या तोमर कुटुंबियांना शिविगाळ करतो. काल रात्री ११ च्या सुमारास त्याने दारू पिऊन शेजारच्या बहादुरसिंग तोमर (६५) यांना शिविगाळ केली. तेव्हा तोमर यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता सुनीलला राग आला. तुम्हाला पाहून घेईल, अशी धमकी देऊन तो निघून गेला. भांडण संपल्यानंतर बहादुरसिंग तोमर अंगणात बाजेवर झोपले.

मध्यरात्री सव्वा बाराला सुनील पुन्हा तिथे आला. त्याने तोमर यांच्या पोटात चाकू खुपसून पळ काढला. कुटुंबियांनी तोमर यांना तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीणचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी पथकासह कोलारी गाठले, तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. आज ,२ एप्रिल रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे एएसआय आनंदा वाघमारे करत आहेत.