७२ शेतकरी धरणात बसले उपोषणाला!; ७ तासांत हलली यंत्रणा
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धामणगाव देशमुख धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेरून जाण्यायेण्यासाठी कायमस्वरुपी रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी करत लोणघाट (ता. मोताळा) शिवारातील ७२ शेतकऱ्यांनी काल, २८ ऑक्टोबरला धरणातच बसून उपोषण सुरू केले. त्यामुळे अवघ्या ७ तासांत यंत्रणा हलली आणि लेखी आश्वासन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.
यापूर्वीही लोणघाटच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या प्रश्नी उपोषण केले होते. त्यावेळीही आश्वासन देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली होती. मात्र रस्ता मोकळा करून देण्यात आलाच नव्हता. धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेरून शेतात येण्याजाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे पिकांची काढणी रखडली आहे. सध्या धरण १०० टक्के भरलेले आहे. लोनघाट, निमखेड व कोथळी हा शेतरस्ता पूर्वी अस्तित्वात होता. तत्कालिन तहसीलदारांनी तीन वेळा पोलिसांना सोबत घेऊन हा शेतरस्ता मोकळा करून दिला होता. मात्र सध्या हा रस्ता अडविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरुपी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी जलआंदोलनाचा इशारा दिला होता.
संतप्त शेतकऱ्यांनी कायमस्वरुपी रस्त्यासाठी धरणातच उपोषण सुरू केले. तहसीलदार सारिका भगत यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. सध्या रस्ता तात्पुरत्या स्वरुपात खुला देत या प्रकरणात धरण हद्द निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करून नकाशाप्रमाणे कायमस्वरूपी रस्ता खुला करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. धरणातील पाणी कमी झाल्यावर ही कार्यवाही केली जाईल. आंदोलनादरम्यान शेख आदिल शेख चांद, शेख शेखजी शेख कदीर, वसीम खाँ बब्बू खाँ यांची तब्येत बिघडली होती.