भिंत अंगावर पडून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; जळगाव जामोद तालुक्यातील घटना
 

 
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भिंत अंगावर पडल्याने ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना जळगाव जामोद तालुक्यातील उसरा येथे काल, २१ एप्रिलला सायंकाळी घडली. सोनाक्षी रमेश वानखेडे (४, रा. टुनकी, ता. संग्रामपूर) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

सोनाक्षी तिच्या आई- वडिलांसोबत मामाच्या घरी उसरा येथे आली होती. मित्रांसोबत ती अंगणात खेळत असताना वादळामुळे मामाच्या घराची भिंत कोसळून तिच्या अंगावर पडली. तिला तातडीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तलाठी व ग्रामसेवकांनी पंचनामा केला असून, या घटनेचा नैसर्गिक आपत्तीमध्ये समावेश करून सोनाक्षीच्या आई वडिलांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत.