संग्रामपूर नगरपंचायतीमध्ये शतप्रतिशत प्रहार!; अध्यक्षपदी उषा सोनोने, उपाध्यक्ष संतोष सावतकार, एक सदस्यही स्वीकृत

 
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाविकास आघाडीने अवघे पाच सदस्य असताना माघार न घेतल्याने काही भलतंच होण्याची चर्चा अखेर बिनबुडाची अफवा ठरली! बहुमत व अभेद्य एकीच्या पाठबळावर प्रहारने नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासह स्वीकृत सदस्याचे एक पद सहज पटकाविले! यामुळे आता नगरपंचायतीत प्रहार व संग्रामपूर मित्र परिवार युतीचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले आहे.

तहसील कार्यालयात नगरपंचायत नगरसेवकांची विशेष सभा आज, १४ फेब्रुवारीला आयोजित केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर व नगर पंचायत मुख्यधिकारी प्रशांत शेळके, कार्यालय अधीक्षक शरद कोल्हे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती व संग्रामपूर मित्र परिवाराचे अनुक्रमे उषाताई सिद्धार्थ सोनोने व संतोष काशिनाथ सावतकार यांना प्रत्येकी १२ मते पडली.

प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ५ मते पडली. सकाळी ११ वाजता प्रथम अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात प्रहार युतीच्या उषा सिद्धार्थ सोनोने यांना १२ मते पडली तर महाविकास आघाडीचे भारत प्रकाश बावस्कर यांना ५ मते मिळाली. संध्याकाळी ४ वाजता उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात प्रहार युतीचे संतोष सावतकार यांना १२ मते तर महाविकास आघाडीचे शेख अफसर शेख अकबर यांना ५ मते मिळाली.

आघाडीला स्वीकृतचा दिलासा
अंतिम टप्प्यात स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात मित्र परिवार प्रहार युतीकडून संत गुलाबबाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक मारोती थोटागे तर महाविकास आघाडीकडून खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रवीण रामदास राजनकार यांची निवड करण्यात आली. हे मतदान हात वर करून घेण्यात आले. निवडणुकीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक, नगरसेवक, नगरसेविका यांचा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी संग्रामपूर मित्र परिवारचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक शंकर पुरोहित यांच्यासह नगरसेवक कविता हरिभाऊ तायडे, शेख इरफान शेख इस्माईल, भारत प्रकाश बावस्कर, शोभा महेश वानखडे, कलीमाबी शेख मजिद, राणू गौरव गांधी, वैभव सुधाकर गायकी, लता अनंत वानखडे, अकिला बानू शेख अयुब, लक्ष्मी नारायण वानखडे, नीलेश देविदास मोरखडे, शेख अफसर शेख अकबर, हमीदाबी आसिफ खान, द्वारकाबाई हरिभाऊ राजनकार  उपस्थित होते. निवडणुकीसाठी नगर पंचायतचे मुख्यधिकारी शेळके, कार्यालय अधीक्षक शरद कोल्हे, कर्मचारी नाना मानकर आदींनी परिश्रम घेतले.