विकी अन् कॅटरिनाचा साखरपुडा?
अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यातील प्रेमसंबंधांची गेल्या काही दिवसांत जोरदार चर्चा सुरू आहे. लवकरच हे जोडपे लग्न करण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचे ऐकिवात असून, “रिंग सेरमनी’ आटोपल्याचे सांगण्यात येते. मात्र या माहितीला तूर्त तरी दोघांनी किंवा त्यांच्या नातेवाइकांनी दुजोरा दिलेला नाही.
सध्या दोघेही एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेले आहेत. बॉलीवूडमध्ये कधी कुणाशी सूत जुळेल आणि ब्रेकअप होईल सांगता येत नाही. कधीकाळी सलमान खान, त्यानंतर रणबीर कपूरशी प्रेमसंबंध ठेवून असणाऱ्या आणि प्रेमाच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या कतरिनाचे प्रेम विकीवर जडल्याची चर्चा एकाएकी सुरू झाली आणि सारेच आश्चर्यचकीत झाले. बॉलीवूडची ही टॉप नायिका एका नवाड्या आणि फारशा प्रसिद्धही नसलेल्या नायकावर प्रेम करतेय यावर सुरुवातीला कुणाचाही विश्वास बसला नाही. मात्र एकमेकांच्या सतत घरी जाणे, हॉटेलला जाणे, फिरायला जाणे, एकत्र पार्ट्यांना जाणे यामुळे त्यांच्यातील प्रेम जाहीर झालं. विकी कौशल आधी भूमी पेडणेकरच्या प्रेमात होता. दोघांचं फाटलं. त्यांच्या नात्यात दरार निर्माण होण्यास कतरिनाच जबाबदार असल्याचे सांगण्यात येते. मात्र दोघेही आता नव्या नात्याबद्दल अगदीच गंभीर असल्याचे दिसत आहे. कारण दोघांनी साखरपुडा उरकल्याची चर्चा आहे. लग्नाची घाई दोघांना झाली आहे. मात्र हे सर्व गोपनीय ठेवले जात आहे. यामागचे कारण दोघांनाच माहीत असले तरी त्यांचे चाहते मात्र या गोष्टीमुळे खुश आहेत.
सध्या दोघांकडेही नाही वेळ
साखरपुडा झाल्याची चर्चा असली तरी विकी आणि कतरिनाकडे लग्नासाठी अजिबात वेळ नसल्याचे सांगण्यात येते. कतरिनाकडे सध्या चित्रपटांची मोठी लिस्टच आहे. यामुळे लग्न तूर्त केले जाईल असे दिसत नाही. तिचा सूर्यवंशी चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. यात तिच्यासोबत अक्षय कुमार आहे. सलमानसोबत ती टायगर ३ मध्ये दिसणार आहे. विकी फारसा बिझी नसला आणि त्याच्याकडे बिग बजेट चित्रपट नसले तरी त्याच्याकडे आदित्य धरचा दी इमोर्टल अश्वत्थामा हा चित्रपट असून, सरदार उधम सिंह, सैम बहादुर याही चित्रपटांत झळकणार असल्याचे सांगण्यात येते.