दीपिका ते कंगणा अन्‌ उर्मिला ते सोनाली... सलमानसोबत का नाकारले काम?

 
अभिनेत्री दीपिका पदुकोनने २००७ मध्ये शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यापूर्वी २००५ मध्ये ती हिमेश रेशमियाच्या नाम है तेरा या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. दीपिकाला बॉलिवूडमधील पहिली ऑफर सलमान खानने दिली होती. मात्र त्यावेळी तिने ती ऑफर नाकारली होती. जर  दीपिकाने ती ऑफर स्वीकारली असती तर तिचे बॉलिवूडमधील पदार्पण सलमान खानसोबत झाले असते.

दीपिकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ओम शांती ओमपूर्वी सलमानने तिला त्याच्या एका चित्रपटाची ऑफर दिली होती. पण त्यावेळी मला अभिनय आणि चित्रपटांमध्ये रस नव्हता. माझे आणि सलमानचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहे. त्यानेच मला माझा पहिला चित्रपट ऑफर केला होता. त्यावेळी मी नुकतीच मॉडेलिंग सुरू केली होती. माझ्यासोबत काम केलेल्या कुणीतरी   त्याला माझे नाव सुचवले होते, असे दीपिका म्हणाली.

दीपिकाशिवाय आणखी काही अभिनेत्री आहेत ज्यांनी सलमानची ऑफर नाकारली होती. यात दीपशिखा नागपाल, उर्मिला मातोंडकर, सोनाली बेंद्रे, ऐश्वर्या राय यांच्या नावांचा समावेश आहे. कंगना राणावतने बॉलिवूडमध्ये अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले. मात्र तिला इंडस्ट्रीतील कोणत्याही खानसोबत काम करायचे नाही. तिला कोणत्याही खानची गरज नाही, असे तिने अनेकदा मुलाखतीत सांगितले आहे. तिला सलमानसोबत कधीच काम करायचे नाही. कारण त्याच्या चित्रपटांचे श्रेय अभिनेत्रीला जात नाही. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने सलमान खानसोबत जब प्यार किसी से होता है या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. पण त्यानंतर मात्र ट्विंकलने सलमानसोबत पुन्हा कोणत्याही चित्रपटात काम केले नाही.  

रिपोर्ट्‌सनुसार, ट्विंकल खन्नाने सलमानसोबतच्या चित्रपटांच्या सर्व ऑफर्स नाकारल्या होत्या. सोनाली बेंद्रेनेही सलमानसोबतच्या काही चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत.  हम साथ साथ हैं या चित्रपटात दोघेही रोमान्स करताना दिसले होते. सोनाली बेंद्रेची सलमानसोबतची जोडीही दर्शकांना खूप आवडली होती. मात्र या चित्रपटानंतर सोनाली बेंद्रेने काही वैयक्तिक कारणांमुळे सलमानसोबत काम करण्यास नकार दिला होता. हम साथ साथ है या चित्रपटाच्या दरम्यान काळवीट प्रकरणात सलमानचे नाव समोर आल्यानंतर सोनालीने सलमानसोबत काम करण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. मात्र यात किती तथ्य आहे, हे सांगता येणार नाही. उर्मिला मातोंडकरचे नावदेखील सलमानसोबत काम न करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत आहे. सलमान आणि उर्मिला मातोंडकर यांनी जानम समझा करो या चित्रपटात एकत्र काम केले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे उर्मिला आणि सलमानने पुन्हा एकत्र काम केले नाही, असे म्हटले जाते.

सलमानने या अभिनेत्रींचे घडवले करिअर
काही अभिनेत्रींनी सलमानसोबत काम करण्यास या ना त्या कारणाने नकार दिला असला काही अभिनेत्रींना सलमान खाननेच बॉलिवूडमध्ये लॉन्च केले हे विशेष. यापैकी काही आज बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्री झाल्या आहेत. सलमानने दबंग चित्रपटातून सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकरला लॉन्च केले. याशिवाय सलमानने जय होमधून एकेकाळी डान्स कोरिओग्राफर असलेल्या डेझी शाहला लॉन्च केले. सलमानने  जरीन खानला वीर चित्रपटातून लॉन्च केले आहे.