Chanderi News : थाटामाटात पार पडलं शिबानी- फरहानचं लगीन!; ना सप्तपदी, ना कबूल है..., मग लग्न झालं कसं..वाचा...

 
खंडाळा ः अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर यांचा विवाहसोहळा काल, १९ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला. मात्र विवाह सोहळ्यात सप्तपदी किंवा निकालच्या रस्म झाल्या नाहीत. त्‍यामुळे हा सोहळा जरा हटके ठरला आहे.

लाल रंगाचा वेडिंग गाऊन परिधान केलेली शिबानी लग्नात खूपच सुंदर भासत होती. फरहानने काळा सूट परिधान केला होता. जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर हा सोहळा झाला. गेल्या काही वर्षांपासून शिबानी आणि फरहान एकमेकांच्या प्रेमसंबंधात होते. शेवटी ते लग्नाच्या बेडीत अडकले. हृतिक रोशन आणि त्याच्या कुटुंबीयांनी या सोहळ्याला आवर्जुन हजेरी लावली. शिबानी- फरहानने एकमेकांना वचत देत रिंग सेरेमनी करत एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याची शपथ घेतली. दोघांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीला रजिस्टर मॅरेज केले होते. १८ फेब्रुवारीला शिबानीला हळद लागली होती. फरहानचे हे दुसरे लग्न आहे, तर शिबानीचे पहिले आहे. फरहानचे यापूर्वी २०१६ मध्ये अधुना भबानीसोबत लग्न केले होते.

१६ वर्षे संसार केल्यानंतर दोघे वेगळे झाले. त्‍यानंतर २०१८ पासून शिबानी आणि फरहान प्रेमात आहेत. सोशल मीडियावर टॉपलेस फोटो पोस्ट केल्यामुळे ती सर्वांत आधी चर्चेत आली होती. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला सपोर्ट केल्यामुळेही ती चर्चेत आली होती. शिबानी पुण्याची असून, २७ अॉगस्ट १९८० रोजी तिचा जन्म मराठी कुटुंबात झाला. तिला अनुषा आणि अपेक्षा या दोन बहिणी आहेत. अनुषासुद्धा बॉलीवूडमध्ये काम करत आहे. गायक आणि अभिनेत्री अनुषा यापूर्वी करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. नंतर त्‍यांचा ब्रेकअप झाला. फरहान आणि शिबानीच्या वयात सात वर्षांचे अंतर आहे. शिबानी ४१ वर्षांची तर फरहान ४८ चा आहे. फरहानशी तिची पहिली भेट २०१५ मध्ये टीव्ही शो आय कॅन टू डेटच्या सेटवर झाली होती. तेव्हा फरहान विवाहित होता.