प्रेम अन्‌ विश्वासामुळे टिकले अजय-काजोलचे नाते!; २३ वर्षांचा सुखी संसार, अशी झाली लव्हस्टोरी..!

 
अजय देवगण आणि काजोलच्या लग्नाचा काल, २४ फेब्रुवारीला २३ वा वाढदिवस झाला. पडद्यावर त्यांची जोडी सुपरहिट ठरलीच; मात्र त्याहीपेक्षा पती- पत्नी म्हणून दोघांचे नाते सुपरहिट ठरले, असे म्हणावे लागेल. बॉलिवूडमध्ये एवढे दीर्घकाळ नाते टिकल्याची खूप कमी उदाहरणे आहेत. काजोलने घरच्यांचा विरोध असताना अजयशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असला तरी आज मात्र तिच्या घरच्यांना देखील तिने घेतलेल्या निर्णयाचा अभिमान वाटतो...

काजोल आणि अजयची पहिली भेट झाली ती १९९५ मध्ये हलचल चित्रपटाच्या सेटवर. चित्रपटाच्या शूटिंगसाठी जेव्हा ती तयार झाली तेव्हा चित्रपटात हिरो कोण, असे सर्व जण विचारत होते. तेव्हा कुणीतरी सेटवर कोपऱ्यात बसलेल्या अजयकडे बोट दाखवले. त्यानंतर चित्रपटाच्या सेटवर आमच्यात मैत्री झाली, असे काजोलने सांगितले होते. जेव्हा त्यांची ओळख झाली तेव्हा अजय देवगण दुसऱ्या एका मुलीला डेट करीत होता आणि काजोलसुद्धा तिच्या बॉयफ्रेंडची तक्रार अजयकडे करीत होती. त्यानंतर काजोलचा ब्रेकअप झाला.

आम्ही दोघांनी कधीच एकमेकांना प्रपोज केले नाही. मात्र तरीही आम्ही एकत्र असल्याचे आम्हाला वाटायचे, असे काजोलने तिच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितले होते. अजयने देखील त्यांच्या पहिल्या भेटीविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. काजोल सेटवर खूप जोरजोरात बोलायची. त्यामुळे तिला पुन्हा भेटायची इच्छा होत नव्हती. तसे वागणे मला आवडत नव्हते, असे अजय म्हणाला होता. मात्र त्यानंतर सर्वच बदलले, असे तो म्हणाला.

अजय आणि काजोल ४ वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या कुटुंबियांनी लग्नाला परवानगी दिली तरी काजोलच्या वडिलांनी मात्र तिच्यासोबत चार दिवस बोलणे बंद केले होते. काजोलने करिअरकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे तिच्या वडिलांना वाटत होते. मात्र काही दिवसांनी काजोलच्या घरचे कसेबसे तयार झाले आणि २३ फेब्रुवारी १९९९ ला अतिशय साध्या पद्धतीने दोघांचे लग्न पार पडले. त्यानंतर गेली २३ वर्षे त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. दोघेही बॉलिवूडमध्ये असताना एवढे दीर्घकाळ नाते टिकणे ही सामान्य गोष्ट नक्कीच नाही. मात्र एकमेकांवरील प्रेम आणि विश्वास यामुळे दोघांचे नाते घट्ट झाल्याचे बॉलिवूडमध्ये बोलले जाते.