शेतकऱ्यांना बुलडाणा कृषी विभागाचे आवाहन… किटकनाशक, तणनाशकांची फवारणी करताना ही काळजी घ्या!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कीड, रोगावर किटकनाशके व शेतातील तणाच्या उच्चाटनासाठी तणनाशके फवारणी करण्यात येत आहे. शेतात उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधे फवारतात. रासायनिक औषधे शेतात, झाडांवर फवारताना मुख्यत: तीन प्रकारे धोका निर्माण होऊ शकताे. रासायनिक औषधांचे झाडांवर अत्यंत बारीक कण हवे बरोबर श्वासोच्छवासासोबत शरीरात जातात. फवारणी करताना त्वचेच्या संपर्कामधून तथा डोळ्यांव्दारे शरीरात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कीड, रोगावर किटकनाशके व शेतातील तणाच्या उच्चाटनासाठी तणनाशके फवारणी करण्यात येत आहे. शेतात उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधे फवारतात. रासायनिक औषधे शेतात, झाडांवर फवारताना मुख्यत: तीन प्रकारे धोका निर्माण होऊ शकताे. रासायनिक औषधांचे झाडांवर अत्यंत बारीक कण हवे बरोबर श्वासोच्छवासासोबत शरीरात जातात. फवारणी करताना त्वचेच्या संपर्कामधून तथा डोळ्यांव्दारे शरीरात जातात. फवारणी करताना नकळत तोंडाव्दारे खाताना, धुम्रपान करताना शरीरात जाऊ शकतात…

किटकनाशके वापरताना सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी

  • गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरुस्त करून वापरावे. किटकनाशके फवारणी यंत्रात भरताना सांडू नये यासाठी नरसाळ्याचा वापर करावा. तणनाशक फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशक फवारणीसाठी वापरू नये. किटकनाशक फवारताना संरक्षक कपडे वापरावे. फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवावे. झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत. किटकनाशकला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे. फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब लाकडी दांड्याचा किंवा काठीचा वापर करावा. किटकनाशक पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करताना अथवा फवारणीवेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे. पाऊस येण्यापूर्वी किंवा पाऊस झाल्यानंतर तसेच तीव्र उन्हात फवारणी करू नये.
  • फवारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुऊन खाणे, पिणे करावे. फवारणीच्यावेळी लहान मुले, जनावरे पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवावे. उपाशी पोटी फवारणी न करता फवारणीपूर्वी न्याहरी करावी. फवारणी करताना वापरलेली भांडी आदी साहित्य नदी, नाला किंवा विहीरीजवळ धुवू नयेत. धुताना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावेत. किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करून टाकाव्यात. फवारणी करताना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी त्यास तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये. त्यासाठी सोयीस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी. किटकनाशके फवारण्याचे काम करताना वापरण्याचे कपडे स्वतंत्र ठेवावे व वेळोवेळी स्वच्छ धुऊन काढावेत. किटकनाशके अंगावर पडू नये म्हणून वाऱ्याच्या विरुध्द दिशेने फवारणी करू नये. किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यास किमान दोन आठवडे जाऊ देऊ नये. जमिनीवर सांडलेले किटकनाशक हातांनी न पुसता व त्यावर पाणी न टाकता ती माती, चिखल यांच्या सहाय्याने शोषून घ्यावेत व जमिनीत गाडून टाकाव्यात. डब्यांवरील मार्गदर्शक चिन्हांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. त्यानुसार हिरवा रंग कमी विषारी, निळा रंग मध्यम विषारी त्यानंतर पिवळा रंग तीव्र विषारी व शेवटी लाल रंग अती तीव्र विषारी खूण असलेली औषधी क्रमाने वापरावे.

विषबाधा झाल्याची लक्षणे अन्‌ उपाययोजना…

  • विषबाधा ही किटकनाशके, तणनाशके यांच्या त्वचेशी संपर्क अथवा पोटात गेल्यास होते. विषबाधा व इतर आजार यांचा लक्षणात बरेचदा साम्य राहू शकते.
  • विषबाधेची लक्षणे : अशक्तपणा व चक्कर येणे, त्वचेची जळजळ होणे, डाग पडणे, घाम येणे, डोळ्यांची जळजळ होणे, पाणी येणे, अंधूक दिसणे, तोंडातून लाळ गळणे, तोंडाची आग होणे, उलटी येणे, मळमळणे, हगवण होणे, पोटात दुखणे, डोळेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी, जीभ लूळी पडणे, बेशुध्द होणे, धाप लागणे, छातीत दुखणे, खोकला येणे, फिट्स येणे.
    विषबाधेची शंका असल्यास खात्री करा, की रोग्याचा किटकनाशकांसह संपर्क आला होता काय, नेमके कोणते किटकनाशक वापरले, शरीरात किती गेले व केव्हा गेले, ही डॉक्टरांसाठी माहिती महत्वाची आहे. रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहोचवा. वापरलेल्या किटकनाशकाच्या रिकाम्या डब्यासह किंवा माहितीपत्रक, फोटो काढून उपचारासाठी डॉक्टरास उपलब्ध करून द्यावे.

विषबाधेनंतर तातडीने करावयाचे प्रथमोपचार
किटकनाशकांची पोटातून, त्वचा, डोळे, श्वसनेंद्रिये आदीद्वारे विषबाधा होऊ शकतो. विषबाधा झाल्यास बाधित व्यक्तीस अपघात स्थळापासून दूर न्यावे. त्वचा अंगावरील कपडे बदलावे, त्याचे शरीर, बाधीत भाग ताबडतोब साबणाने स्वच्छ धुवून व टॉवेलने पुसावे. किटकनाशक पोटात गेलेले असल्यास बाधित व्यक्तीस ताबडतोब उलटी, ओकारी करण्याची उपाययोजना करावी. रोग्याला पिण्यासाठी दूध तसेच बिडी, सिगारेट व तंबाखू देऊ नये. रोग्याला घाम येत असल्यास अंगावर पांघरून द्यावे. रोग्याचा श्वासोच्छवास योग्य रितीने सुरू आहे का ते तपासावे. श्वासोच्छवास अनियमित किंवा बंद झाल्यास त्वरित त्याच्या तोंडाला तोंड लावून कृत्रिम श्वासोच्छवास सुरू करावा. रोग्याला झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी टाकावी. रोगी बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणावयाचे प्रयत्न करावे. बेशुद्ध रोग्यास काहीही खाऊ घालण्याचे प्रयत्न करू नये.