अभिष्टचिंतन विशेष ः अचंबित करणारा मादनी ते दिल्ली व्हाया मुंबई प्रवास!
 

 

कोणत्याही असामान्य व्यक्तीच्या जीवन प्रवासाची सुरुवात सहसा सामान्य पद्धतीनेच होते. दूरगामी परिवर्तन, क्रांती मग ती सामाजिक असो व राजकीय असो त्याची सुरुवात देखील अशीच वैयक्तिक पातळीवर होते. इतिहासाचा वा अलीकडच्या काळातील प्रसिद्ध, यशस्वी व्यक्ती, परिणामकारक घडामोडींचा आढावा घेतला तर ही बाब सिद्ध होते. राजमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातही अशा व्यक्ती वा व्यक्तिमत्वाची वानवा नाही. तीनदा मुंबई व तीनदा दिल्ली सर करणारे खासदार प्रतापराव जाधव हे याचे एक मासलेवाईक उदाहरण ठरावे! आज, 25 नोव्हेंबरला खासदार प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने...

ऐंशीच्या दशकात राजकारण व समाजकारणाच्या अथांग महासागरात पोहोण्याचा सराव करणाऱ्या गणपत जाधव या शेतकऱ्याचा मुलगा अशीच केवळ त्यांची ओळख होती. त्यामुळे  मर्दमावळा काही वर्षांनी राजकारण गाजवेल, नव्हे कधी न पाहिलेली मुंबई एकदा नव्हे तीनदा गाठेल, नुसतीच मुंबई नाही तर विधानसभेत जाईल, मंत्री होईल असे भाकीत कोणी वर्तवले असते तर त्याला सर्वांनी वेड्यात काढले असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा भगवा तीनदा लोकसभेवर फडकवेल असे चुकून सांगितले असते तर सांगणाऱ्याची वेड्याच्या इस्पितळात रवानगी करायला देखील कुणी मागे पुढे पाहिले नसते. मात्र मेहकर तालुक्यातील मादनी येथील या युवकाने कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना, बेताची परिस्थिती असताना हा राजकीय चमत्कार घडविला. तेव्हाचा ’प्रतापी’ युवक आज नुसताच खासदार नसून, जिल्ह्याचे राजकारण करणारा, अनेकांचे राजकारण घडविणारा अन्‌ बिघडविणारा महनेता बनला आहे. मातोश्रीचा निष्ठावान सैनिक, लाखो शिवसैनिकांचा सेनापती, सर्व सामान्यांचा लाडका नेता, आपल्या झंझावताने भल्याभल्या नेत्यांना पालापाचोल्यासारखे भिरकावून पराभूत करणारा अजिंक्य वीर ठरला आहे. मात्र यासाठी त्यांनी अनेक वर्षे घरादारावर तुळशीपत्र ठेवत राजकारण, मतदारसंघ पिंजून काढत निष्ठावान मावळ्यांची फौज उभारली. जनसामान्यांच्या समस्यांसाठी संघर्ष उभारला. प्रस्थापित नेत्यांशी दोन हात केले, घर कुटुंब विसरून शिवसेनेलाच आपला परिवार तर सैनिकांनाच आपले सोयरे मानले. राज्यातील राजकारण संक्रमण अवस्थेत असताना ऐंशीचे दशक संपत असताना प्रतापराव जाधव नामक या युवकाने खांद्यावर भगवा घेतला. प्रारंभीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मेहकर मतदारसंघात सेना वाढविणे कठीण होते. 1995 पासून मात्र हा मतदारसंघ ’प्रताप गड’ झाला. तेव्हा सेनेचे बिनीचे शिलेदार असलेले ( स्वर्गीय) दिलीपराव रहाटे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी भगवा ब्रिगेड वाढविली. कालांतराने दिलीपरावांच्या अकाली निधनाने सेनेची जबाबदारी त्यांच्या एकट्यावर आली. मात्र याने विचलित न होता या युवा नेत्याने  आपली घोडदौड सुरूच ठेवली. यामुळे स्वबळावर सुरू केलेल्या प्रतापरावांच्या या वाटचालीचे मै तो अकेला चला था जानिबे मंजिल मगर, लोग आते गये कारवा बनता गया... असे रूपांतर झाले, ती आजच्या अजिंक्य प्रतापगडाची पायाभरणी ठरली. या धडपड्या युवा नेत्याच्या मेहनतीला पहिले निवडणुकीय यश सन 1989 च्या मेहकर खरेदी- विक्री संघाच्या इलेक्शनमध्ये मिळाले. सेनेचे पॅनेल विजयी झाले. राज्यात सेना- भाजपचा वरचष्मा वाढण्याचा व सत्ता येण्याची चाहूल देणारा तो काळ. काँग्रेसला सावध करणाऱ्या त्या छोट्या लढाईनंतर सन 1990 च्या विधानसभा निवडणुका लागल्या. मेहकरातून अर्थात प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाली. बुलडाणा मतदारसंघात राजेंद्र गोडे तर जलंब मतदारसंघात विजय मिळवून शिवसेनेने जिल्ह्यात  जोरदार एंट्री केली. मात्र सेनेच्या वाघाला पराभूत व्हावे लागले. मात्र यामुळे नाउमेद न होता त्यांनी मेहकर अर्बनमध्ये विजय मिळविला तर त्यापाठोपाठ 1992 मध्ये देऊळगाव माळी जिल्हा परिषद मतदातसंघातून विजय मिळविला. ही पदे आणि 1993 मध्ये मिळविलेले मेहकर बाजार समितीचे सभापती पद त्यांच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचा टप्पा अन्‌ भावी आमदारकीचा भरभक्कम पाया ठरला. सन 1995 च्या विधानसभा संग्रामात माजी मंत्री सुबोध सावजी यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभूत करून ते जायंट किलर ठरले. या नंतर या नेत्याला विजयाची, दिग्गजांना पराभूत करण्याची अन्‌ इतिहास घडवण्याची सवयच लागली. एकदा हाती आलेली संस्था, सत्ता, पद कायम एकहाती ठेवणे मग त्यांचा छंद अन्‌ जिद्दच झाली. तोपावेतो सेनेत वजन वाढल्याने त्यांना 1997 मध्ये क्रीडा राज्यमंत्री तर ते 1998 मध्ये पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री झाले. यानंतर मात्र ते राजकारणात थांबलेच नाही! त्यांची राजकीय घोडदौड सुरूच राहिली.

हक्काचा मतदारसंघ राखीव झाल्यावरही...
सन 1999 व 2005 च्या लढाईत देखील विजयी होऊन ते तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले. आमदारकीच्या या 15 वर्षांच्या  कामगिरीला विरोधक, विरोधी राजकीय  पक्ष  कुणीच रोखू शकले नाही. पण त्याला रोखले ते एका प्रशासकीय निर्णयाने!  मतदारसंघांच्या पुनर्रचनेत मेहकर अनुसूचित जातींसाठी राखीव ठरला. यामुळे कार्यकर्ते  अस्वस्थ झाले, काळजीत पडले, पण हा स्वयंभू नेता अटळ राहिला, अढळ राहिला त्यांचा आत्मविश्‍वास, संकटातून मार्ग शोधण्याचा, त्यावर मात करण्याची त्यांची जिद्द पुन्हा एकदा कामी आली.

राखीव मुळे उघडले ’खास दार’
संकट म्हणजे एक संधी देखील असते, हे हेरलेल्या या लोकनेत्याने मग राज्याची राजधानी सोडून देशाच्या राजधानीकडे लक्ष दिले!  नावातच ’प्रताप’ असणाऱ्या या नेत्याने नवखा असताना हार मानली नाही, मग आता स्वतः दिग्गज झाल्यावर हार मानायचा प्रश्‍नच नव्हता. सन 2009 च्या लोकसभा लढतीत सेनेने त्यांना उमेदवारी दिली. दिल्लीची लढाई लढायचा पहिलाच प्रसंग. समोर उमेदवार कोण तर राजेंद्र भास्करराव शिंगणे. ते इलक्शन विलक्षण ठरले, लढाई नव्हे रणसंग्राम ठरलं. जिल्ह्यासह वऱ्हाड मध्ये गाजले पण शेवटी शिवसैनिकच नाचले! शिंगणेंना पराभूत करून ते पुन्हा एकदा जायंट किलर ठरले!  या पाठोपाठ सन 2014 व 2019 ची लढत जिंकून त्यांनी लोकसभेची देखील हॅट्‌ट्रिक केली, अशी कामगिरी करणारे ते जिल्ह्यातील पहिले नेते ठरले. कदाचित हा विक्रम अबाधितच राहील. शोलेचा गाजलेला डायलॉग म्हणजे ’गब्बर की टापसे तुम्हे एकही आदमी बचा सकता है, खुद्द गब्बर! याच धर्तीवर त्यांच्या चाहत्यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास भाऊ की टापसे तुमको (राजकीय विरोधकको) एकही आदमी बचा सकता है वो खुद्द भाऊच...