आर्य चाणक्य सांगतात, पती-पत्नीच्या नात्यात या गोष्टी नकोच!

 
आर्य चाणक्य त्यांच्या रणनीतीसाठी ओळखले जातात .चाणक्य नीती या ग्रंथात त्यांनी मानवी जीवनासाठी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आहे. राजकारणाची त्यांना सखोल जाण होती. त्यांनी आई - वडिलांच्या नात्यापासून तर पती- पत्नीच्या नात्याची माहिती आपल्या ग्रंथात दिली आहे. माणसाने जीवनात कसे वागावे, बोलावे, कुणाशी कसे संबंध ठेवावे याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. पती- पत्नीचे नाते  महत्त्वाचे आणि मजबूत असते. मात्र काही गोष्टींमुळे हे नाते बिघडायला वेळ लागत नाही. पती- पत्नीचे संबंध ठीक नसतील तर घराची युद्धभूमी व्हायला वेळ लागत नाही, असे आर्य चाणक्य सांगतात. पती- पत्नीचे नाते घट्ट करण्यासाठी आर्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात काही उपाय सांगितले आहेत.

विश्वास
आर्य चाणक्य म्हणतात की, प्रत्येक नात्याचा पाया हा विश्वास असतो. पती- पत्नीच्या नात्यात विश्वास नसेल तर त्या नात्याला काही अर्थ राहत नाही. विश्वास नसेल तर तुमच्या मनात संशयाची भीती निर्माण होते. त्यामुळे नाते तुटण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे नात्यात कधीच शंका घेऊ नका. पती-पत्नीचे नाते हे काचेसारखे पारदर्शक ठेवा.

अहंकाराला ठेवा दूर
आर्य चाणक्य सांगतात, की पती- पत्नीच्या नात्यात अहंकाराला कधीही स्थान नसावे. चाणक्यांच्या नीती शास्त्रानुसार, पती- पत्नी दोघांनाही धर्मात समान दर्जा आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे.

खोटे नका बोलू
चाणक्य नीतीनुसार, पती- पत्नीने कधीही आपसात खोटे बोलू नये. तुम्ही खोटे बोलत असाल तर तुमच्या नात्यात बचत करण्यासारखे काही शिल्लक राहत नाही. दोघांमध्ये असलेले वाद मिटविण्यावर भर द्या.

घरातल्या गोष्टी घरातच...
पती- पत्नीने आपल्या व्यक्तीगत जीवनातील सर्वच गोष्टी एकमेकांना सांगितल्या पाहिजेत. मात्र दोघांच्या अंतर्गत बाबी या घराबाहेर दुसऱ्या व्यक्तीला कधीच सांगू नका. मात्र पती- पत्नीने आपसातील बाबी एकमेकांपासून कधीही लपविण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही जर खरे नाते जपत असाल तर तुम्हाला कोणतीही गोष्ट लपविण्याची गरज पडणार नाही, असे चाणक्य सांगतात.

एकमेकांचा अपमान करू नका
तुमचे संबंध केवळ विश्वास आणि प्रेमावर आधारित नसतात. ते एकमेकांच्या प्रती असलेल्या आदरावर सुद्धा अवलंबून असतात. पती- पत्नीने कधीही एकमेकांचा अपमान करू नये. तिसऱ्या व्यक्तीदेखत आपल्या जोडीदाराशी बोलताना तुम्ही सन्मानजनक भाषाच वापरली पाहिजे, असे आर्य चाणक्य सांगतात.