गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला.! हृदय पिळवटून टाकणारी स्टोरी; नवऱ्याने बायकोला नोकरीला लावण्यासाठी जीवाचा आटापिटा केला,

२ एकर जमीन विकली अन् नोकरी लागल्यावर बायकोने नवऱ्याला घराबाहेर काढले! नवऱ्याची एसपींकडे तक्रार; चिखली तालुक्यातील प्रकार...
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला" असं एक गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंग वर आहे. या गाण्यातील कथानकाला साजेसा प्रकार चिखली तालुक्यात घडलाय. बायकोला नोकरीला लावण्यासाठी नवऱ्याने जीवाचा आटापिटा केला, स्वतःच्या वाट्यावर असलेली २ एकर जमिनी तिच्या शिक्षणासाठी विकली. मात्र बायकोला सरकारी नोकरी लागल्यावर मात्र बायकोचे राहणीमान बदलले..बायको नोकरीवरून रात्री उशिरा घरी यायची, त्यातून दोघा पती पत्नीत वाद होऊ लागले..याचे कारण पुढे करून सरकारी नोकरीवाल्या बायकोने नवऱ्यासोबत राहायला नकार दिला, नवऱ्याला बायको घरातही घेत नाही. शिवाय बायकोने आपल्यापासून २ मुलींना देखील तोडले, मला मुलींना भेटूही दिले जात नाही असा दावा पत्नीग्रस्त पतीने केला आहे..तशी रीतसर तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे देण्यात आली आहे.
संजय केशव पवार( रा. गुंजाळा, ता.चिखली) यांनी याप्रकरणाची तक्रार एसपी सुनील कडासने यांच्याकडे केली आहे. तक्रारीनुसार संजय पवार यांचे २००४ मध्ये मामाच्या मुलीसोबत लग्न झाले होते. त्यांची पत्नी १२ वी विज्ञान शाखा उत्तीर्ण असल्याने त्यांनी बायकोला पुढे शिकवण्याचा निर्णय घेतला. ४ वर्षांचा स्टाफ नर्सिग चा कोर्स करण्यासाठी संजय पवार यांनी त्यांच्याकडील स्वतःची २ एकर शेती विकली.
शेती विकून आलेल्या पैशातून संजय पवार यांनी पत्नीच्या शिक्षणाचा खर्च केला. आपले दिवस पालटतील असा विश्वास त्यांना होता. दरम्यान पत्नीला आरोग्य विभागात कंत्राटी तत्वावर नोकरी लागली. त्यावेळी दोघे पती पत्नी आणि त्यांच्या दोन मुली असे पवार कुटुंब नोकरीच्या ठिकाणी भाड्याने खोली करून राहू लागले.
सरकारी नोकरी लागल्यावर...
दरम्यान काही महिन्यांनी संजय पवार यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मध्ये कायमस्वरुपी सामावून घेण्यात आले. संजय पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे की सरकारी नोकरी लागल्यावर पत्नीचे राहणीमान बदलले. पत्नी नोकरीवरून घरी रात्री उशिरा यायची त्यामुळे या कारणावरून दोघा पती पत्नीत वाद होऊ लागले. याचेच कारण पुढे करून पत्नीने संजय पवार यांच्यासोबत राहायला नकार दिला. दोघा पती-पत्नीतला वाद मिटवण्यासाठी नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला अपयश आले. पतीने माझ्याकडे येऊनही पाहूनही नये अशी ताकीद पत्नीने दिली, पत्नी दोन मुलींना घेऊन वेगळी राहू लागली." माझी स्वतःची जमीनही गेली, माझ्या दोन्ही मुलींपासून दूर झालो त्यामुळे मी उघड्यावर आलो, मला न्याय द्या" असे आर्जव संजय पवार यांनी एसपी कडासने यांना दिलेल्या तक्रारीत केले आहे.