नवदाम्पत्याचा आदर्शदायी उपक्रम ; वृक्ष लागवडीने केली वैवाहिक जीवनाला सुरुवात! ना नाच गाणे, ना गाजावाजा विवाह सोहळाही ठरला संदेशदायी, बुलढाण्यात या विवाह सोहळ्याचे होतेय कौतुक..
May 7, 2024, 20:24 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सध्या सर्वत्र लगीनसराई सुरू आहे. ठिकठिकाणी, गावागावात विवाह सोहळा संपन्न होत आहेत. नवदांपत्य आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहेत. यात कुठे गाजावाजा करत लग्न सोहळा आयोजित होतो, तर कुठे अगदी साध्या पद्धतीने. याच दरम्यान बुलढाण्यातील एका आदर्श विवाह सोहळ्याची चर्चा होत आहे. त्या लग्नात ना डीजे होता, ना कुठला गाजावाजा अन् कधी न होणारे म्हणजे लग्न ही वेळेत लागलं हे विशेष. लग्नात जमलेली सगळी मंडळी म्हणत होती , असं लगीन झालं पाहिजे. असा आदर्श घालून देणारा विवाह सोहळा बुलढाणा शहरातील यशोदा नगर येथे संपन्न झाला. लग्न सोहळ्यानंतर देखील नवदांपत्याने केलेली कृती कौतुकास पात्र ठरत आहे. ती, म्हणजे वृक्ष लागवडीने आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली.
बुलढाणा येथील प्रशासनात वैद्यकीय सेवा देणारे व येळगाव येथील रहिवासी सुभाष भीमराव राजपूत यांची लाडकी लेक स्नेहल आणि उतराद पेठ चिखली येथील ह.भ. प. जगन्नाथ इंगळे यांचा मुलगा घमश्याम यांचा विवाह सोहळा २ मे रोजी संपन्न झाला. वर - वधू दोघेही उच्चशिक्षित आहे. शिक्षणाला उच्च संस्काराची देखील जोड असल्याने लग्नात अनाठायी खर्च टाळण्याचा निर्णय दोघांनी घेतला. २ मे, रोजी त्यांचा विवाह सोहळा अगदी कौतुकास पात्र ठरला आहे. लग्न देखील वेळेत लागले, डीजे नाही, ऑर्केस्ट्रा नाही, कुठलाही गाजावाजा न करता थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेऊन या नवदांपत्यानी एकमेकांना स्वीकारलं. इतकचं नाही तर , लग्न सोहळा झाल्यानंतर देखील वृक्ष लागवड करून आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. हा प्रेरणादायी विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी सगळ्यांचेच योगदान होते. त्यामध्ये सर्वप्रथम वरपिता ह.भ.प जगन्नाथ इंगळे, वधू पिता सुभाष भीमराव राजपूत, यशोदा नगर येथील रहिवासी संतोष पाखरे, प्रदीप वनारे, नितीन पाटील, श्याम भांगे या सर्वांच्या पुढाकारातून हे सगळ घडल. वर मुलाचे काका रवींद्र इंगळे, कोलारा येथील सेवानिवृत्त शिक्षक एकनाथराव मोरे, येळगाव येथील श्रीकृष्ण राजपूत, रतनसिंग राजपूत, ज्ञानेश्वर राजपूत,सुखदेव राजपूत, संतोष राजपूत, विनोद पाटील (उतराद पेठ) तसेच संत निरंकारी मंडळ बुलढाणा शाखेचे प्रमुख हनुमान भोसले आणि सर्व सदस्य यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले.