चिखली पोलिसांना सॅल्युट केलाच पाहिजे; १३ वर्षीय मुलीचे किडनॅपिंग करणाऱ्या "मुन्नाशहा"ला पश्चिम बंगाल मधून उचलले; मुलीची केली सुटका! वाचा थरारक स्टोरी...

 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..चिखली पोलिसांची ही कामगिरी खरचं सॅल्युट करायला लावणारी आहे..एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या भामट्याला चिखली पोलिसांनी पश्चिम बंगालमधील कोलकाता जवळून उचलले आहे. आरोपीच्या ताब्यातून मुलीची देखील सुटका करण्यात आली आहे . पोलिसांचे पथक आरोपीला घेऊन निघाले असून आज रात्री उशिरा ते चिखलीत पोहचू शकतात.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १६ सप्टेंबरला चिखली पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या मुन्नाशहा मुबारकशहा ( रा.खडकपुरा, चिखली) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

  पिडीत अल्पवयीन मुलीही मूळची उत्तर प्रदेशातील असून ती तिच्या आत्याच्या घरी चिखलीत राहत होती. मुलगी राहत असलेल्या ठिकाणीच एका घराचे बांधकाम सुरू होते, त्यावर आरोपी मुन्नाशहा हा मजुरी काम करत होता. घटनेच्या दिवशी गणपतीचा भंडारा असल्याने मुलीचे नातेवाईक भंडाऱ्याच्या कार्यक्रमात व्यस्थ होते. तीच संधी पाहून मुन्नाशहा ने पिडीत मुलीला पळवून नेले होते. 

दरम्यान चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणेदार संग्राम पाटील यांनी तपास प्राधान्याने करण्याच्या सूचना पोलीस पथकाला दिला. तांत्रिक तपासाच्या आधाऱ्या मुलीला घेऊन आरोपी पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लागलीच पोलिसांचे एक पथक कोलकत्ता येथे रवाना झाले, कोलकत्ता जवळून ६० किमी अंतरावरील एका ठिकाणावरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून मुलीची देखील सुटका केली. आता पोलिसांचे पथक आरोपीला घेऊन चिखली येथे येत आहे.