फार्मसिस्ट : आरोग्य व्यवस्थेतील "अज्ञात योद्धा"! २५ सप्टेंबर – जागतिक फार्मसिस्ट दिन; युवा लेखक सोमेश इंगळे लिहितात....! वाचा "खास" लेख...
शिक्षण आणि अभ्यासक्रम
बारावी विज्ञान शाखेनंतर प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थी फार्मसी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतो. यामध्ये डी.फार्मसी (२ वर्षे डिप्लोमा), बी.फार्मसी (४ वर्षांची पदवी), एम.फार्मसी (२ वर्षांची पदव्युत्तर पदवी) तसेच संशोधनाच्या संधी उपलब्ध आहेत. सध्या राज्यभर फार्मसी कॉलेजांची संख्या वाढली असली, तरी गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विपुल संधी आहेत.
करिअरच्या संधी
फार्मसिस्ट क्षेत्र वैद्यकीय प्रतिनिधी, औषधनिर्माता, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मेडिकल कोडिंग, आय.टी., प्राध्यापक तसेच मेडिकल सेवा अशा अनेक क्षेत्रांत मार्ग खुले करते. कष्टाळू व तळमळीने काम करणाऱ्यांना या क्षेत्रात निश्चितच उज्ज्वल भविष्य आहे.
भारत – जगाची फार्मसी
भारतातून मोठ्या प्रमाणावर औषधसाठा निर्यात केला जातो. म्हणूनच भारताला जगाची फार्मसी म्हणून मान्यता मिळाली आहे. देशात सुमारे १२ लाख रिटेल केमिस्ट असून, त्यापैकी केवळ महाराष्ट्रातच १ लाखांहून अधिक आहेत. मार्केटमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त औषधांचे ब्रँड उपलब्ध असून, त्यातील रुग्णांसाठी योग्य औषधाची निवड आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी फार्मसिस्टवरच असते.
हक्क आणि जबाबदाऱ्या
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये नमूद औषध उपलब्ध नसल्यास त्याऐवजी पर्यायी दर्जेदार औषध देण्याचा अधिकार फार्मसिस्टला मिळावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. तसेच रुग्णांच्या आर्थिक फायद्यासाठी कमी किंमतीच्या गुणवत्तापूर्ण औषधांचा पर्याय सुचविण्याचा आणि किरकोळ आजारांवर समुपदेशन करण्याचा हक्कही फार्मसिस्टला असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
आव्हाने आणि ऑनलाइन फार्मसी...
आजच्या घडीला मोठ्या रुग्णालयांमध्ये फार्मसिस्ट अल्प मानधनावर काम करतात. लायसन्स भाड्याने देण्याची प्रथा रोखण्यासाठी एकजूट गरजेची असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ऑनलाइन व ई-फार्मसी ही संकल्पना रूजू होत असली, तरी ती रुग्णहिताची नाही, असे तज्ज्ञ स्पष्ट करतात.
अभिमानाचा क्षण
महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडे सुमारे ५ लाख नोंदणीकृत फार्मसिस्ट आहेत. औषधनिर्मिती आणि विक्री हे एकाच प्रोफेशनलच्या हाती असावे, यावर भर दिला जात आहे. फार्मसिस्टचा दर्जा आणि अधिकार मुख्य प्रवाहात आणले गेले, तर आरोग्य क्षेत्र अधिक सक्षम होईल.
जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त आज या अज्ञात पण अत्यंत महत्त्वाच्या योद्ध्याला सलाम. समाजाच्या आरोग्य सेवेत योगदान देणाऱ्या सर्व फार्मसिस्ट बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा.
✍️ श्री. सोमेश सोपानराव इंगळे (एम.फार्म), निवेदक रुग्णसेवक