माझी लाडकी बहिण योजनेसाठी डाक विभागाचे महिलांना महत्वाचे आवाहन..! फायदा होईल..

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील लाभ थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महिलांनी टपाल कार्यालयास भेट देऊन आधार लिंक बचतखाते काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण’ योजना सुरु केली आहे. यामध्ये महिलांच्या आधार लिंक केलेल्या सक्षम खात्यात थेट लाभ हस्तांतरणद्वारे रक्कम जमा करण्यात येणार आहे. याकरिता लाभार्थी महिलांना आधार लिंक बचत खाते काढणे आवश्यक आहे. आधार लिंक बचत खाते काढताना आधार संलग्न - संमती पत्र खातेधाराकाने भरून देणे गरजेचे आहे. तसेच सर्व विद्यमान बचत खातेधारकांनी आपले बचत खाते आधार संलग्न करून घेणे गरजेचे आहे. आधार लिंकमुळे इतर योजनांचेही थेट लाभ हस्तांतरण रक्कम डाकघर बचत खात्यात जमा होईल.
महिला लाभार्थीच्या बचत खात्यात थेट लाभ हस्तांतरणद्वारे दरमहा रक्कम जमा होण्यासाठी लाभार्थी महिला खातेदारांनी टपाल कार्यालयास भेट देऊन आधार लिंक डाकघर बचत खाते काढावे, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.