मुक्ताईच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; शुक्रवारी बुलढाण्यात मुक्काम! १०० दिंड्यांचा सहभाग..  

 
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तब्बल तीनशे पंधरा वर्षांची वारीची आणि अध्यात्मिक परंपरा असलेल्या मुक्ताईच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी पंढरपूर कडे प्रस्थान केले. 
आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या आषाढी वारीने आज १८ जूनला कोथळी येथील जुन्या मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान केले. आज मलकापुरात मुक्काम केल्यानंतर आदिशक्ती मुक्ताईची पालखी नियोजित मार्गानुसार मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, २१ जून शुक्रवार रोजी ही पालखी बुलढाण्यात पोहोचणार आहे. येथील जुनागाव परिसरातील श्री हनुमंताचे मंदिर आणि नगरपरिषदेच्या शाळेत पालखीतील भक्तगणांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवार, २२ जूनला सहकार विद्या मंदिर येथे महाप्रसाद संपन्न झाल्यानंतर पुढील यात्रेस पालखी मार्गस्थ होणार आहे. 
दरवर्षी, आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी बुलढाण्यातून जाते. २१ जूनच्या मुक्कामानंतर २२ जूनला सकाळी सहकार विद्या मंदिरच्या सभागृहात भक्तजणांच्या महाप्रसादाची व्यवस्था बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्या पुढाकारातून करण्यात आली. जुने मंदिर कोथळी येथून प्रस्थान होऊन श्रीक्षेत्र मुक्ताईनगर नवीन मंदिर येथे पालखी विसावणार आहे. १९ जून रोजी सकाळी पुढच्या प्रवाससाठी मार्गस्थ होणार आहे. दसरखेड येथे साठे परिवार आणि गावकऱ्यातर्फे होणाऱ्या आदर तिथ्याचा स्वीकार केल्यावर पालखीचा पहिला मुक्काम मलकापूर येथे राहणार आहे. तेथील मराठा मंगल कार्यालय येथे पालखी आणि वारकरी विसावा घेणार आहे. मलकापूर येथील आदिशक्तीचे निस्सीम भक्त पानसरे परिवार यजमान आहेत.
शंभर दिंड्याचा सहभाग
 यावर्षी पालखी सोहळ्यामध्ये जवळपास १०० दिंड्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये या दिंड्यांची संख्या अधिक पटीने वाढणार आहे.
 
           आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी ही पंढरपूर मध्ये सर्वप्रथम प्रवेश करणारा पालखी सोहळा आहे. आदिशक्ती मुक्ताबाई यांची पालखी वाखरी येथे सामोरे गेल्याशिवाय इतर संत पंढरपूर मध्ये प्रवेश करत नाहीत, एवढा मान आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला आहे. तसेच सर्वात आधी निघणारा पालखी सोहळा सर्वात लांब पल्याचा पालखी सोहळा आणि तब्बल सात जिल्ह्यांमधून प्रवास करणारा पालखी सोहळा म्हणून या आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याची ख्याती आहे.
       पालखीच्या पुढील मार्गावरील गावे आणि शहरातील, भाविकांनी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्रभैय्या पाटील , पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे सह आदिशक्ती मुक्ताबाई फडावरील समस्त वारकऱ्यांनी केलेले आहे.
         
 सात जिल्ह्यातून प्रवास
 मध्य प्रदेशातील बरामपुर जिल्ह्यातील नाचणखेडा येथील राजेश प्रकाश पाटील यांच्या बैल जोडीला रथ ओढण्याचा मान मिळाला आहे. गत अकरा वर्षापासून हा मान कायम आहे. आदीशक्तीची पालखी राज्यातील सर्वात लांब पल्ल्याची पालखी आहे. पंढरपूर ला जाताना पालखी सात जिल्ह्यातून प्रवास करते.तसेच यंदा मुक्ताईच्या पालखी रथात चांदीच्या ९ किलो वजनाच्या पादुका व चोपदराची काठी सुद्धा चांदीची असणार आहे. त्याचप्रमाणे यावर्षी १०० दिंड्या पायी वारी सोहळ्यात सहभागी होणार आहे. पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, जुने मुक्ताई मंदिराचे व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे यांनी ही माहिती दिली आहे.