पांडुरंगाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! रविवारपासून पंढरपुरात...

 
पंढरपूर (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): सावळ्या विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. २ जूनपासून भक्तांना विठुरायाच्या चरणांचे दर्शन घेता येणार आहे. श्री विठ्ठल व रुख्मिणी मंदिरांच्या गाभाऱ्याच्या संवर्धनाचे काम पूर्णत्वास येत आहे, त्यामुळे १५ मार्चपासून बंद असलेले पदस्पर्श दर्शन आता सुरू होणार आहे. लाखो भाविकांना विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची आतुरता लागून आहे.
श्री विठ्ठल व रुख्मिणी मंदिरांच्या गाभाऱ्यात अनावश्यक ग्रॅनाईट फरशी बसवण्यात आलेली होती, शिवाय इतरही अनावश्यक बदल करण्यात आले होते. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या टीमने पाहणी केल्यानंतर मंदिराला मुळ स्वरूप देण्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू होते. त्यामुळे सकाळी ६ ते ११ यावेळेत भाविकांना मुखदर्शनाची सोय मंदिर समितीकडून करण्यात आली होती. आता हे काम जवळपास पूर्ण होत असल्याने २ जूनपासून भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे.