EXCLUSIVE रोखठोक..! मेहकरचा मेळावा सरकारचा की शिवसेनेचा? व्यासपीठावर शिवसेनेचे रुमाल, शिवसेनेच्या नेत्यांची भाषणे अन् जिल्हाधिकारी, सीईओंची उपस्थिती!
या मेळाव्याच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीवर शिवसेनेचे अधिकृत पक्षचिन्ह आहे. निमंत्रक म्हणून समस्त पदाधिकारी शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. दुसरीकडे, याच कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या धनादेशांचे वाटप, विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन नियोजित होते. त्यामुळे शासकीय आणि पक्षीय कार्यक्रमाची सीमारेषा नेमकी कुठे होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यक्रम शासकीय असेल तर व्यासपीठावर पक्षीय रुमाल, पक्षचिन्ह आणि पक्षीय भाषणांना स्थान कशासाठी? आणि कार्यक्रम शिवसेनेचा असेल तर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पक्षीय व्यासपीठावर कोणत्या शासकीय कर्तव्याच्या अनुषंगाने उपस्थित होते?
शासकीय योजनांसाठी खर्च होणारा पैसा हा सार्वजनिक निधी असतो. त्या योजनांचा लाभ देणे ही शासनाची जबाबदारी आहे. प्रशासन हे सर्वसामान्य जनतेचे असून, कोणत्याही एका राजकीय पक्षाचे नाही. त्यामुळे शासकीय योजनांचे लाभ वितरण करताना पक्षीय आणि शासकीय कार्यक्रमांमधील फरक स्पष्ट ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाचीही आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचारानुसार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती असणे समजण्यासारखे आहे. मात्र, पक्षीय स्वरूप असलेल्या व्यासपीठावरील त्यांची उपस्थिती कोणत्या शासकीय आदेशानुसार होती, याचा खुलासा होणे आवश्यक आहे. .
या कार्यक्रमाचे अधिकृत आयोजन नेमके कोणी केले होते? कार्यक्रमाचा खर्च शासनाच्या तिजोरीतून करण्यात आला की शिवसेनेच्या माध्यमातून? जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात कोणते शासकीय आदेश होते? शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण पक्षीय व्यासपीठावर करण्याचे औचित्य काय? या प्रश्नांची उत्तरे जिल्हा प्रशासनाने देणे अपेक्षित आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, मदतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रशासकीय तटस्थतेचे भान राखले गेले का, हा स्वतंत्र आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण यांची अधिकृत भूमिका अद्याप उपलब्ध झालेली नाही. जिल्हा प्रशासन याबाबत स्पष्टीकरण देणार का, याकडे लक्ष लागले आहे.