चुनावी जुमला ? बुलढाणा जिल्ह्यातील २३ हजार ७७८ लाडक्या बहिणींचे अर्ज बाद..! लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.....
Feb 26, 2025, 13:05 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली. या योजनेने महायुती सरकारला अभूतपूर्व असे यश मिळवून दिले. मात्र आता निवडणुकीनंतर या योजनेची समीक्षा सरकारने सुरू केली आहे. लाडक्या बहिणींच्या अर्जांची फेर तपासणी सुरू आहे. अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या नोकरदारांची पत्नी आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना योजनेतून अपात्र ठरविण्यात येत आहे. त्यामुळे तपासणीअंती बुलढाणा जिल्ह्यातील २३ हजार ७७८ लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत..त्यामुळे बाद करण्यात आलेल्या लाडक्या बहिणींना आता योजनेच्या आठव्या हफ्त्याचा लाभ मिळणार नाही...
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. अर्ज करा आणि लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घ्या अशी मोहीम राज्यात राबवली गेली. बुलडाणा जिल्ह्यात एकूण ६ लाख ७१ हजार १८३ महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या. मात्र आता त्यातून काही महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. योजनेचे निकष व अटीकडे माहिती सरकारने आता लक्ष घातले असून अर्जांची फेर तपासणी सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील २३ हजार ७७८ लाडक्या बहिणींचे अर्ज आता बाद करण्यात आले आहेत. चिखली तालुक्यातील २५००,देऊळगाव राजा १०३९, जळगाव जामोद ९७४, खामगाव २६४७, लोणार ८५३, मलकापूर ७०९, मेहकर २०६, मोताळा १६३०, नांदुरा १६१४, संग्रामपूर ७६५, शेगाव १३७४, सिंदखेडराजा १७३९ अशा एकूण २३ हजार ७७८ लाडक्या बहिणींना या योजनेतून विविध कारणांमुळे बाद करण्यात आले आहे...