चल गं सखे चल गं सखे पंढरीला ! बुलढाण्यातून आषाढीसाठी सव्वादोनशे बसेस सुटणार! खामगावातून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ; 

१ हजार ३११ भाविक पांडुरंगाच्या भेटीसाठी रवाना.. 
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपूर येथील आषाढी यात्रा वा वारीसाठी जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी यंदा एसटी महामंडळाने सुसज्ज आयोजन केले आहे. यंदा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बुलढाणा विभागातर्फे आषाढी साठी तब्बल दोनशे वीस विशेष बस गाड्या (यात्रा स्पेशल) सोडण्यात येणार आहे. तसेच खामगावातून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस रेल्वेगाडी सुटणार आहे. या यात्रा स्पेशल गाडीच्या दोन फेऱ्या असून पहिली फेरी काल रविवारी रवाना झाली. यामध्ये एकूण १३११ भाविकांनी पंढरीची वाट धरली.
    बुलढाण्याचे विभाग नियंत्रक आणि यंत्र अभियंता तथा प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी नितीन जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा आषाढी यात्रेसाठी सुसज्ज नियोजन करण्यात आले आहे . नियोजनात वाहतूक विभागाचे सुधीर भालेराव, हरीश नागरे यांचाही सहभाग होता.
बुलढाणा विभागातील (जिल्ह्यातील ) सात एसटी बस आगार मधून या विशेष बस गाड्या सोडण्यात येणार आहे. विभागाचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा येथील बस आगार मधून सर्वाधिक म्हणजे त्रेचाळीस बस सोडण्यात येणार आहे. या खालोखाल खामगाव आगारातून चाळीस बस, मेहकर आगारातून अडोतीस बस, मलकापूर आगारातून एकोनतीस, चिखली मधून एकवीस बस सोडण्यात येणार आहेत. 
 जळगाव जामोद आगारातून अठ्ठावीस तर शेगाव मधून चौदा यात्रा विशेष सोडण्यात येणार आहे. या सात बस आगार अंतर्गत लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, बुलढाणा, चिखली,खामगाव, जळगाव, मलकापूर, मेहकर येथून या बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बुलढाणा विभागातून जाणाऱ्या बसचा मुक्काम भीमा यात्रा स्थानक या तात्पुरत्या बस स्थानक येथे राहणार आहे. तिथे ते सोलापूर विभाग नियंत्रकाच्या मार्गदर्शन मध्ये यात्रा ते वाखरी, रींगण सोहळा, शटल सेवा पुरविणार आहे.
एकीचे बळ!
 दरम्यान कोणत्याही गावातील भाविक, वारकरी यांनी एकजूट दाखविली तर त्यांना तालुका ठिकाणी वा अन्य ठिकाणी जाऊन प्रवास करण्याची तसदी घ्यावी लागणार नाही! याचे कारण चाळीस भाविकांनी एकत्र येऊन संबधित आगार प्रमुखांशी संपर्क केला तर त्यांच्या गावात बस दाखल होणार आहे. त्यांच्या गावातूनच ही बस त्यांना थाटात पंढरपूर ला घेऊन जाणार आहे. यासाठी किमान ,चाळीस भाविकांनी एकजूट दाखविणे आवश्यक आहे. अर्थात एसटी महामंडळ त्यांच्याकडून अग्रीम भाडे वसूल करणार आहे,हे येथे उल्लेखनीय. आगार प्रमुखांनी यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
दोन दिवस विठ्ठल एक्सप्रेस
खामगाव येथून काल १४ व १७ जुलै ला विशेष रेल्वे गाड्या सुटणार आहे. यात सात जनरल बोगी सह वातानुकूलित, शयनयान देखील राहणार आहे. १५ आणि १८ जुलै रोजी ही एक्स्प्रेस पंढरपूर येथून निघून खामगाव येथे येणार आहे.खामगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव खान्देश, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौड, कुर्डुवाडी असा या रेल्वेचा मार्ग आहे.