BULDANA LIVE DIWALI SPECIAL प्रेमाला सीमा नाही; याला म्हणतात लव्ह स्टोरी...!!

अचानक त्याच्या लक्षात आलं - तिचं पहिलं दर्शन सिंगापूरच्या एअरपोर्टवर झालं आणि उद्याची भेट होणार होती सिडनी एअरपोर्टवर. 'ही आपल्याला आयुष्यभर एअरपोर्टवरच भेटत राहणार बहुतेक...!

 

 सिंगापूरच्या विमानतळावर ऑस्ट्रेलियाच्या कनेक्टिंग फ्लाइटची वाट बघत निखिल वेळ घालवत होता. इयरफोन लावून किशोरची गाणी ऐकत समोरच्या फिरत्या मार्गावर चाललेला मुलांचा पकडापकडीचा खेळ पाहात होता. कानात 'मेरे सपनोकी रानी कब आयेगी तू' रंगलं होतं. इतक्यात ७ - ८ वर्षांची एक गोंडस मुलगी फिरत्या मार्गावरून बाहेर येताना तोल जाऊन पडली व जोरात किंचाळली. त्या आवाजाने आजूबाजूच्या साऱ्यांचंच लक्ष तिकडे वेधलं गेलं. त्या चिमुरडीला उठताच येईना. तिचे आई-बाबा पुढे सरसावले. ती कळवळून रडत होती. जो पाय दुखावला होता, त्याला ती हातही लावू देईना. निखिलही इयरफोन काढून पाहू लागला. तेवढ्यात एक तरुणी त्या मुलीजवळ आली. अत्याधुनिक वेशभूषेतूनही तिचं भारतीयत्व लपत नव्हतं. तिने गोड बोलून व खांद्यावरच्या पर्समधून चॉकलेट काढून देऊन बोलता बोलता त्या छकुलीच्या दुखऱ्या पायावरून सराईतपणे हात फिरवला. इथे दुखतंय का बेटा तुला? तिने तिची दुखरी जागा ओळखून तिथे हलकेच मालिश केलं व तिच्या त्या भल्यामोठ्या पर्समधून एक कसलासा स्प्रे काढून तो त्या जागेवर वापरला. ती चिमुरडी शांत होऊन हे सारे सोपस्कार करून घेते आहे हे बघून तिच्या आई-बाबांच्या जिवात जीव आला. जसं रडून दमलेल्या त्यांच्या लेकीच्या चेहऱ्यावर हसू फुललं, तशी त्यांचीही कळी खुलली. एव्हाना त्या तरुणीने बोट पकडून तिला थोडं चालायलाही लावलं होतं. निखिल हे सारं कौतुकाने पाहत होता. इतक्यात त्याचं फ्लाइट अनाउन्स झालं. 

पासपोर्ट, बोर्डिंग पास चाचपत तो रांगेत उभा राहिला. त्या गडबडीतही ती अनामिका त्याच्या हृदयात धडधडत होती. आपली सीट शोधत तो जागेवर बसला. त्याच्या शेजारची सीट अजूनही रिकामी होती. निखिलच्या हृदयाच्या धडधडीने आता लय पकडली. 'मेरी सपनोकी रानी कब आयेगी तू...' शेवटी जेव्हा विमानाचं दार बंद झालं, तेव्हा ती धडकन हळूहळू मूळपदावर आली. एअर होस्टेसच्या सूचना देऊन झाल्यावर त्यानं डोळे मिटले...        


डॉ. निखिल साने! सिडनीच्या स्टेम सेल इन्स्टिट्यूटमधला रिसर्च सायंटिस्ट ! मुंबईत प्रोफेसर असणाऱ्या आईवडिलांचा तो एकुलता एक मुलगा. निखिल झाला तेव्हा त्याला मोठेपणी सायंटिस्ट करण्याचं स्वप्न त्यांनी जोडीने पाहिलं होतं. पण आपल्या स्वप्नाचं आपल्या मुलावर ओझं होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली. लहानपणापासून त्याचे विविध छंद जोपासत त्यांनी त्याला वाढवलं होतं. त्याचं जणू फळ म्हणून निखिल बारावीनंतर प्युअर सायन्सच्या ओढीने बायलॉजी विषय घेऊन पुढे रिसर्चकडे वळला होता. पीएच.डी.साठी त्याला सिडनीच्या इन्स्टिट्यूटमधून बोलावणं आलं. पीएच. डी. पूर्ण करून तो आता पेटंट मिळवण्याच्या खटपटीत होता. खरं तर त्याचं लग्नाचं वय झालं असूनही, कामाच्या गडबडीत त्याला लग्नासारख्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी वेळ मिळत नव्हता. त्याचे आईबाबाही आता सूनमुख बघायला आतुर झाले होते. कितीतरी चांगल्या मुली त्याला सांगून येत होत्या. पण निखिलने आजवर आईबाबांना त्या आघाडीवर पुढे जाऊ दिलं नव्हतं. आता पेटंटचं त्याचं काम शेवटच्या टप्प्यावर आलं होतं. पुढल्या वर्षी येईन तेव्हा नक्की लग्न करून जाईन अशी हमी त्याने दिली होती. या पार्श्वभूमी वर त्याची आजची प्रगती समाधानकारक होती. त्याच्या मनाने वधुसंशोधन नकळत सुरू केलं होतं. विमानतळावर उतरल्यावर सामान ताब्यात येताच त्याने बाहेर पडून तडक टॅक्सी घेतली. लांबवर दिसणारा टेलस्ट्रा टॉवर जसजसा जवळ येऊ लागला, तशी निखिलला सुटी संपून कामावर परतल्याची तीव्रतेने जाणीव झाली. त्यानंतरच्या आठवड्यातल्या
शुक्रवारची गोष्ट! निखिलचा शाळेतला एक मित्र शशांक. निखिलच्याच एरियात त्याचं अपार्टमेंट होतं. शुक्रवारी रात्री त्याने निखिलला फोन केला. निखिल, तुझ्याकडे एक काम होत. रविवारी भेटशील ? काय विशेष? मी फ्री आहे रविवारी! घरीच ये लंचला. दुपारी व्यवस्थित बोलता येईल. ओके, डन! 

  रविवारी दुपारी निखिल शशांककडे पोहोचला, तेव्हा त्याने त्याचा आवडता इटालियन पास्ता तयारच ठेवला होता. दोघांचं जेवण झालं आणि शशांकने त्याच्या बॅगमधून लॅपटॉप काढला. निखिल, आईबाबांनी माझ्या लग्नाचा प्रोजेक्ट हातात घेतलाय. बऱ्याच प्रयत्नांनंतर या साइटवर ही मुलगी आवडली. माहितीवरून कळलं की तुमच्या इन्स्टिट्यूटच्या मेलबर्नच्या हॉस्पिटलमध्ये आय.सी.यू. स्पेशालिस्ट आहे. नाव स्नेहा उपासनी. जर नेटवरची सगळी माहिती बरोबर असेल, तर मला वाटतं की अगदी परफेक्ट मॅच आहे. निखिल उत्सुकतेने पाहत होता. शशांकने साइट उघडली आणि स्क्रीनवर स्नेहा उपासनीचा फोटो पहिला मात्र.. निखिलच्या छातीचा ठोका चुकला. तीच, ती सिंगापूर एअरपोर्टवर पाहिलेली 'सपनोंकी रानी' समोर स्क्रीनवर झळकत होती. शशांक विचारत होता, कशी वाटते? निखिलने आवंढा गिळत हातानेच शशांकच्या पसंतीवर शिक्कामोर्तब केलं. तिचे डिटेल्स लिहून घे. माझं एवढं काम कर. तुझ्या तिथल्या कॉन्टॅक्ट्सकडून तिच्याबद्दल इतर काही माहिती मिळतेय का बघ. निखिलने मान डोलावली. तरी त्याने शशांकला छेडलंच, तुमच्या दोघांमध्ये आधीच काही बोलणं झालंय का? नाही रे! शुक्रवारीच तिला साइटवर पाहिलं आणि हॉस्पिटलचा रेफरन्स बघून तुझ्याकडून माहिती घ्यायचं ठरवलं." 'सांगाव का याला, मी हिला आधीच पाहिलीये..... आणि तेव्हाच
ती मला आवडलीय.' पण निखिलच्या मनातलं द्वंद्व तोंडावाटे बाहेर पडेल तर शपथ.तो घरी परतला, तेव्हा त्याची मनःस्थिती घालमेलीची झाली होती. नियतीच्या या अजब न्यायानं तो चक्रावला होता. कधी नव्हे ती एक मुलगी आपल्याला लाइफ पार्टनर करावीशी वाटली.. जिला पुन्हा भेटण्याची सुतराम शक्यता नव्हती.. आणि तीच मुलगी चारच दिवसांत पुन्हा डोळ्यासमोर यावी ती असा पेच बनून... खरं तर निखिलला तिच्याबद्दल जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता होती. पण आता या बदललेल्या परिस्थितीमध्ये त्याला माहिती मिळूनही उपयोग नव्हता. 'माहिती मिळत नाही म्हणून शशांकला सांगणं' ही बनवेगिरी करणं त्याला अशक्य होतं. तो आता हे काम पूर्ण करण्याच्या तयारीला लागला. तिला कोण ओळखत असण्याची शक्यता आहे? मित्रांना विचारायचं तर लग्नाच्या बाबतीत स्नेहासारख्या गोड मुलीबद्दल दुसऱ्या मुलांना विचारणं फारसं शहाणपणाचं होणार नाही. एखादी मैत्रीण? जी आय.सी.यू. संलग्न कोणत्यातरी डिपार्टमेंटमध्ये असेल? तो जरा विचारात पडला. तितक्यात त्याला आठवली .परवीन मुराद.... जी त्याच्याबरोबर मागची दोन वर्षे सिडनीच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होती आणि मागच्याच वर्षी लग्न करून मेलबर्नला तिथल्या लॅबमध्ये गेली होती. म्हणजे आय.सी.यू. शी निगडित असणारच. त्याने परवीनला फोन लावला. पलीकडून आवाज आला. "हाय निखिल, कैसे याद किया?" "हाय परवीन! शादी क्या हुई तुम तो सिडनी बिलकुल भूल गयी!" मुझे पता है इन बातोंके लिये तो तुमने कॉल नही किया होगा कहो, क्या बात है?" "आपके हॉस्पिटलके आय.सी.यू. सेक्शनमे एक स्पेशालिस्ट है - स्नेहा उपासनी. क्या तुम जानती हो उसे?" निखिलने ताबडतोब मुद्दयाला हात घातला. "ओहो... अच्छा, तो सायंटिस्ट भी इन्सान होते है! जानकर खुशी हुई कहाँ मिली आपको स्नेहा ?" निखिलने घाईघाईने तिची गलतफहमी दूर केली. आपल्यासाठी नव्हे, आपल्या मित्रासाठी आपण ही चौकशी करत आहोत याचं त्याला अचानक समाधान वाटलं. स्वतःसाठी अशी चौकशी करणं फार अवघड असल्याचं त्याला जाणवलं. अभ्यास, करिअर अशा गोष्टींमध्ये पुढे असणारी काही मुलं अशा आघाडीवर कधी कधी मागे पडतात. तशीच काहीशी निखिलची परिस्थिती होती. तिकडून परवीन उत्साहात सांगत होती. "यार निखिल, दोस्तको छोडो, और अपनी बात चलाओ स्नेहा इज अ परफेक्ट मॅच फॉर यू. मै जिम्मा लेती हूँ तुम्हारी बात चलाऊँ क्या?" निखिलने आपल्या मनाला थोपवलं होतं, तसं कसंबसं परवीनला थोपवलं. तिच्याकडे शशांकने सांगितलेल्या आणखी एक- दोन गोष्टींची चौकशी करून व तिचे आभार मानून त्याने कॉल संपवला.

   एक दीर्घ निश्वास टाकत त्याने शशांकचा नंबर लावला. पलीकडे रिंग वाजली. शशांकने तिकडून फोन घेतला. एवढ्या लवकर निखिलने आपले काम केल्याचं पाहून त्याला आश्चर्य वाटलं. "थँक्स दोस्ता, माझं अंतर्मन मला सांगतंय की हा योग जुळून येणार. दोन दिवसांत एवढी प्रगती ? ती जर हो म्हणाली, तर तुला माझ्याकडून पार्टी लागू " त्यानंतर चक्रं भरभर फिरली आणि पुढच्याच वीकेंडला शशांक व स्नेहा दोघांची मेलबर्नमध्ये भेट होऊन दोघांनी पुन्हा भेटायचं ठरवलं. या खेपेला स्नेहा सिडनीत यायची होती. शुक्रवारी रात्रीच ती हॉटेलमध्ये येऊन उतरली. शनिवारी त्या दोघांची पुन्हा भेट झाली. मध्यंतरीच्या आठवड्यात दोघांनी एकमेकांच्या आईवडिलांशी चॅटिंग केलं होतं. शनिवारच्या भेटीत दोघांनी लग्नाचा निर्णय पक्का केला. शनिवारी रात्री तिला हॉटेलवर सोडल्यावर शशांकने पहिला फोन निखिलला लावला. एव्हाना निखिल समजून चुकला होता की आपला पतंग कापला गेला आहे. शशांककडून अपेक्षित बातमी ऐकल्यावर त्याने त्याचं अभिनंदन केलं. शशांक खूपच खुशीत होता. "निखिल, केवळ तुझ्यामुळे हे सगळं इतक्या झटपट जमून आलं. मी उद्या एअरपोर्टवर तिला सोडायला जाणार आहे. तू तिथे ये. मला तुझी ओळख करून द्यायची आहे तिच्याशी." अनपेक्षितपणे शशांकने निखिलची विकेट घेतली. निखिल गडबडला. पण आयत्या वेळी त्याला न येण्याबद्दल काही कारणही देता येईना. फोन बंद झाल्यावर निखिलला जाणवलं की उद्याचा दिवस त्याच्यासाठी किती कठीण आहे. त्याने मनावरचं ओझं हलकं करण्यासाठी विरंगुळा म्हणून टीव्ही ऑन केला. पण त्याच्या नजरेसमोर वेगळाच चित्रपट चालू होता. अचानक त्याच्या लक्षात आलं - तिचं पहिलं दर्शन सिंगापूरच्या एअरपोर्टवर झालं आणि उद्याची भेट होणार होती सिडनी एअरपोर्टवर. 'ही आपल्याला आयुष्यभर एअरपोर्टवरच भेटत राहणार बहुतेक. शशांकचं लग्न होईपर्यंत आपण परत भारतात गेलो असू तिकडे शशांक मग सहकुटुंब सुटीत आला की मुंबई एअरपोर्टवर त्यांना बाय-बाय करायला आपण जात राहणार.' स्वतःच्या असल्या स्वप्नरंजनाचं निखिलला हसू आलं. उद्याचा दिवस उजाडावा की न उजाडावा या संभ्रमात तो झोपी गेला.

रविवारी संध्याकाळी तो एअरपोर्टबाहेर ठरल्या ठिकाणी पोहोचला. एअरपोर्टच्या बाहेरच्या कॅफेमध्ये त्यांचं भेटायचं ठरलं होतं. पाच-दहा मिनिटांतच ते दोघं आले. निखिलने शशांकला हात केला. एवढ्यात स्नेहा गाडीतून उतरली. शशांकबरोबर जसजशी ती जवळ येऊ लागली, तसतसं निखिलच्या अंतरंगात विविध भावनांचं काहूर माजलं. पण ते दोघं जेव्हा अगदी जवळ आले, तेव्हा निखिलला कसलंसं समाधान वाटू लागलं होतं. काय ते त्यालाच नीट कळेना. स्वतःच्या मनातलं वादळ लपवत त्याने त्या दोघांचं स्वागत केलं. ते तिघे आत गेले.

  जशा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या, तसंतसं निखिलचं समाधान वाढू लागलं. ऑर्डर देण्यासाठी शशांक उठून काउंटरपाशी गेला, तेव्हा न राहवून निखिलने स्नेहाला प्रश्न केला. "चौदा मेला तुम्ही सिंगापूर एअरपोर्टवर होता का?" स्नेहाच्या भुवयांची कमान वक्र झाली. "सिंगापूर एअरपोर्ट ? चौदा मेला ? बाय नो मीन्स का, असं का विचारलंत?"निखिलने मोकळेपणाने
हसत तिला सांगितलं, “तुमच्यासारखीच एक मुलगी मी सिंगापूर एअरपोर्टवर त्या दिवशी पाहिली होती.' 'माझ्यासारखी मुलगी सिंगापूर एअरपोर्टवर.... चौदा मे ला ? आर यू टॉकिंग अबाउट स्निग्धा ?" "स्निग्धा..?" "माझी धाकटी बहीण स्निग्धा. माझ्याहून फक्त दीड वर्षाने लहान. सिंगापूरला फिजिओथेरपिस्ट आहे. आमच्यातल्या साम्यामुळे बरेच जण फसतात." "नक्कीच. मी फसलो ना! त्या दिवशी एअरपोर्टवर तिला बघितली आणि चार दिवसांत शशांकने लग्नाच्या साइटवरचा तुमचा
फोटो दाखवला. तुम्ही तीच मुलगी आहात असं मला वाटलं." स्नेहा आता खट्याळपणे हसत होती. शशांकही आता त्यांच्यात सामील झाला होता. स्नेहाने निखिलला हसत हसत छेडलं, "काय हो... एअरपोर्टवर एकदा दिसलेलं माणूस एवढं लक्षात राहील?" पण निखिल अजिबात गडबडला नाही. नियतीचा अजब न्याय त्याच्या लक्षात येत होता. त्याने धिटाईने स्नेहाला विचारलं, "इफ यू डू नॉट माइंड, कॅन यू टेल मी अबाउट स्निग्धाज रिलेशनशिप स्टेटस ?" शशांक व स्नेहाने अभावितपणे हात पुढे करत एकमेकांना टाळी दिली. "येस, येस. शी इज अब्सोल्यूटली सिंगल. माझं लग्न झाल्याशिवाय लग्नाचा विचारही न करण्याची शपथ घेतलीय तिने. मी तुम्हाला तिचा ई-मेल अड्रेस आणि फोन नंबर देते. यू कॅन कॉन्फिडंटली गो अहेड." तेवढ्यानेही तो सुखावला. "तुम्ही आजच तिला कॉंटॅक्ट करा. मीही तिच्याशी बोलतेच." स्नेहाने हमी भरली. निखिलने मग वेळ न दवडता त्याच रात्री स्निग्धाला चॅटिंगसाठी इन्व्हाइट करायचं ठरवलं. निखिलला आता कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. जुळून येत असलेला हा योग त्याला तडीस न्यायचा होता. इतक्यात त्याच्याच फोनची रिंग वाजली. त्याने फोन घेतला. पलीकडून स्नेहा बोलत होती. शशांककडून त्याचा नंबर घेऊन तिने तातडीने फोन लावला होता. निखिल, आय अम सॉरी. निखिलच्या छातीचा ठोका चुकला..

  का, काय झालं? स्निग्धाच्या बाबतीत मी तुला दिलेली माहिती चुकीची आहे. स्निग्धाने नुकतंच तिचं लग्न जमवलंय. तिच्या बॉसने समीरने - तिला केव्हाच प्रपोज केलं होतं. पण मी मोठी बहीण म्हणून माझं लग्न जमेपर्यंत स्निग्धाने त्याला थोपवून धरलं होतं. नाऊ दे आर कमिटेड. आय अम रिअली व्हेरी सॉरी. निखिलला हे अगदी अनपेक्षित होत. सिंगापूर विमानतळावर तिला पहिल्यापासून खरं तर त्याला एकावर एक धक्के बसले होते. पण आज संध्याकाळी स्नेहाशी बोलल्यावर त्याची खात्री पटली होती, 'स्निग्धा पाहताक्षणी आपल्याला आवडणं' ही त्या क्षणांपुरता मर्यादित गोष्ट नव्हती. तिने आपल्या आयुष्यात येण्याची ती नांदी होती आणि आता तिलाही हे सांगायला तो उत्सुक होता. पण स्नेहाच्या त्या फोनने त्याच्या सर्व मनोरथांवर पाणी पडलं. त्यानेच स्नेहाची समजूत काढली खरी, पण रात्र त्याने तळमळत काढली. त्यानंतर आठवडाभर तो खरा निखिल राहिला नव्हता. त्याने जितकं नॉर्मल राहण्याचे प्रयत्न केले, तितक्या प्रकर्षाने त्याच्या भोवतालच्या सहकाऱ्यांना त्याच्यातील बदल जाणवत गेला. शेवटी तर त्याच्या बॉसने त्याला बोलावून त्याच्या या मनःस्थितीचं कारण विचारलं. काहीतरी सांगून त्याने वेळ मारून नेली. पण, मग मात्र त्याच्या बुद्धीने नेहमीप्रमाणे त्याच्या मनाचा ताबा घेतला, आणि त्याने पूर्णपणे स्वतःला कामात झोकून दिलं. त्यानंतर महिनाभरानंतरची गोष्ट. संध्याकाळी बऱ्याच उशिरापर्यंत तो प्रयोगशाळेतच काम करत होता. त्याचं पेटंट नोंदणीसाठी पाठवण्यात आलं होतं, तरीही तो अधिक खोलात जाऊन त्या संदर्भातील विविध चाचण्या करतच होता. मोबाइल वाजला म्हणून त्याने पाहिलं. नंबर अनोळखी होता. त्याने हॅलो म्हणताच पलीकडून मंजुळ आवाजात प्रतिसाद उमटला, हॅलो, मी स्निग्धा उपासनी बोलतेय. तुमच्या कामात व्यत्यय तर नाही ना आला? निखिलचा श्वास थांबला. तो अडखळत म्हणाला, कोण..... कोण बोलतंय म्हणालात?" स्निग्धा, स्नेहाची बहीण, जी सिंगापूरला असते. कसंबसं स्वतःला सावरत निखिल उत्तरला, आलं लक्षात माझ्या. तुम्ही फोन कराल असा अंदाज नसल्याने जरा गडबड झाली. बोला, कशासाठी फोन केलात? पलीकडून गोड घंटी किणकिणली. बरोबर आहे तुमचं. स्नेहाने मला तुमचा नंबर दिला. या वीकेंडला माझी एक मैत्रीण तिच्या काही कामासाठी सिडनीला येते आहे. मीही छोटी सुटी घेऊन थोडा बदल म्हणून तिकडे यायचा विचार करते आहे. पण सिडनीला ती तिच्या कामात असताना तुम्ही मला कंपनी देत असाल तरच..

  निखिलला काय बोलावं कळेना. डोक्यात असंख्य प्रश्नांचं काहूर माजलं होतं. पलीकडून स्निग्धा विचारत होती, सॉरी, मी तुम्हाला फार अडचणीत तर नाही ना टाकत आहे? तुम्ही नाही म्हणालात तरी हरकत नाही. त्यासरशी निखिलच्या तोंडून पटकन खळखळून उद्गार आले, छे छे, अडचण कसली त्यात! तुम्ही जरूर या. मी शक्य तितका तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करीन. त्यावर स्निग्धा हसली. ठीक आहे मग, भेटू आता प्रत्यक्ष. तिने फोन बंद करताना म्हटलं. तिच्याबरोबर हवेत उडतच निखिल घरी पोहोचला. आल्या आल्या त्याने शशांकला फोन लावला. शशांक तेव्हा भारतात होता. शशांकला अर्थातच कल्पना होतीच. अरे हो यार निखिल, स्नेहा म्हणाली होती मला याबद्दल. काहीतरी कारणाने स्निग्धाचं जमलेलं लग्न मोडलं. स्नेहाला तर काय, आनंदच झाला. तिने लगेच स्निग्धाला तुझ्याबद्दल सांगितलं. अगदी फोटोसकट सगळी माहिती दिली. मीही म्हटलं की मी तुला काही सांगण्याऐवजी स्निग्धानेच ते काम करणं जास्त सोपं जाईल. त्यानंतर रात्री नेटवर निखिल आणि स्निग्धामध्ये मनसोक्त चॅटिंग झालं. स्क्रीनवर दिसणाऱ्या तिच्या वाक्यांनी सिंगापूरच्या एअरपोर्टवर दिसलेली स्निग्धा निखिलच्या डोळ्यापुढे पुन्हा एकदा साकारली... डार्क ब्लू जीन्स आणि वर फुलाफुलांच्या शर्टवर पातळ पांढरा स्वेटर घातलेली... त्या छकुलीशी संवाद साधताना मध्ये येणारे तिचे कमरेपर्यंतचे सरळ सोनेरी केस... बोलताना तिच्या चेहऱ्यावर उमटणारे गोड हावभाव... सारं निखिलपुढे जिवंत झालं होतं. फोटोतील साम्यामुळे जरी तो फसला होता, तरी स्नेहाला प्रत्यक्ष पाहताक्षणीच त्याला जाणवलं होतं की... ही ती नव्हेच.' आज स्निग्धाच्या नुसत्या शब्दांनी त्याची खात्री पटली होती की.. हीच ती.' चॅटिंग आटोपून तो झोपला, तेव्हा अकरा वाजले होते. रात्रभर त्याला त्याची 'सपनोंकी रानी'च स्वप्नात दिसत होती..... स्नेहा व स्निग्धाचे आई- वडील मुंबई उपनगरातलेच. दोन्ही मुलींची महिनाभरात विनासायास लग्न जमल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. दोन्ही लग्नं मात्र एका मांडवात होणं शक्य नव्हतं. निखिलला पेटंटच त्याचं काम संपवूनच बोहल्यावर चढायचं होतं आणि शशांक- स्नेहाला इतका वेळ लग्नासाठी थांबायचं नव्हतं. ते दोघं नोव्हेंबरमध्ये विवाहबद्ध झाले. चार दिवस सवड काढून निखिल लग्नाला उपस्थित राहिला. त्या लग्नात निखिल-स्निग्धाच्या लव्ह स्टोरीबद्दलच सर्वांची चर्चा चालू होती. पण... खरं काय झालं, कशामुळे स्निग्धाचं समीरशी जमलेलं लग्न मोडलं हे कोणालाच कळलं नव्हतं. समीरने काहीही कारण न देताच तडकाफडकी हा निर्णय का बरं घेतला ?

  त्याचं काय झालं - स्निग्धाने लग्नाला होकार दिल्यानंतरच्या वीकेंडला दोघांनी सॅटोसा आयलंडला जाऊन हा आनंद साजरा करायचा, असं समीरने ठरवलं. त्याने स्निग्धाला शनिवारी सकाळी तातडीच्या कामासाठी म्हणून ऑफिसला येण्यास सांगितलं. तिथून तो तिला सरप्राइज म्हणून सेंटोसाला नेणार होता. पण नेमकी त्या दिवशी स्निग्धाची तब्येत बिघडली होती. भरपूर ताप आणि त्यामुळे आलेला अशक्तपणा यामुळे तिने येऊ शकत नसल्याचं सांगितलं. समीरचा चांगलाच विरस झाला. पण, बुकिंग वाया घालवणं त्याच्या जिवावर आलं. आपल्या एका मित्राबरोबर तो तिथे पोहोचला. दुपारपर्यंत दोघांनी बऱ्याच राइड्सवर मस्ती केली. एवढ्यात  समीरच्या मित्राने एका जोडप्याकडे त्याचं लक्ष वेधून म्हटलं, समीर, ही तुझी स्निग्धाच आहे ना रे? समीरने चमकून पाहिलं. छे... छे. काहीतरीच काय... असं तो म्हणणार, इतक्यात थोड्या अंतरावरील ते जोडपं त्यालाही दिसलं आणि त्याचे शब्द ओठातच राहून गेले. 'माय गुडनेस, स्निग्धाच तर आहे ही. तब्येत बरी नसल्याचं कारण देऊन ऑफिसला न आलेली स्निग्धा इथे कशी काय? आणि बरोबर कोण तरुण आहे तिच्या ?' त्या दोघांच्या एकूण देहबोलीवरून त्यांच्यातील केमिस्ट्री व्यवस्थित लक्षात येत होती. स्निग्धाला अनोळखी तरुणाबरोबर प्रेमालाप करताना, तेही आपण ऑफिसमधल्याच सहकाऱ्याबरोबर असताना पाहणं हे समीरसाठी धक्कादायक होतं. त्याचा अहं भलताच दुखावला गेला. त्याने तडकाफडकी निर्णय घेतला. बरोबरच्या मित्राला तो म्हणाला, हू केअर्स ? असेल तिचा कोणी बॉय-फ्रेंड. आणि मग समीरचा तिथे फिरण्याचा उत्साह संपला. समीरच्या मनात स्निग्धाने 'आपल्याला बरं नाही असे सांगून फसवलं आहे' याबाबत तिळमात्र शंका उरली नाही. त्याच रात्री त्याने स्निग्धाला आपली एंगेजमेंट तुटल्याचं कळवलं. इकडे खरोखरच तापाने बेजार झालेल्या स्निग्धाला काहीच उलगडा होईना. त्यात तिला सरप्राइज म्हणून स्नेहा आणि शशांक तिच्याकडे अचानक आले होते. दोघे त्यांच्या ठरलेल्या लग्नासंदर्भात सर्व गोष्टींच्या नियोजनासाठी मोठी सुटी घेऊन भारतात निघाले होते. वाटेत सिंगापूरमध्ये दोन दिवसांचा ब्रेक घेऊन पुढे ते भारतात जायचे होते. अनायसे आलोच आहोत तर सँटोसाला भेट देऊन जावं, या विचाराने दोघे दिवसभर तिथे फिरून रात्री स्निग्धाकडे पोहोचले. स्निग्धाचा ताप आता उतरला होता. पण चेहरा मलूल झाला होता. अरेरे.. आधी माहीत असतं तर सँटोसाला न जाता इथेच आलो असतो डायरेक्ट. स्नेहा तिच्या केसांवरून हात फिरवत चुकचुकत राहिली. अगं, ठीक आहे मी. नको काळजी करू. उद्या रविवार आहे. परवापर्यंत ऑफिसला जायलाही मी फिट असेन. स्निग्धा म्हणाली. त्यानंतर आठवडाभरात स्निग्धाने लग्न मोडल्याचं सर्वांना सांगितलं. ते ऐकून स्नेहा एवढी का खूश झाली आहे, याचं उत्तरही थोड्याच दिवसांत सर्वांना मिळालं. स्निग्धाला एकदाच पाहून तिच्याचसारखी दिसणारी स्नेहा प्रत्यक्षात पाहिल्यावर ही ती नव्हे हे ओळखणारं निखिलचं प्रथमदर्शनी जडलेलं प्रेम जिंकलं होतं, तर वर्षभर स्निग्धाला पाहूनही तिच्यासारख्या दिसणाऱ्या स्नेहाला दुसऱ्या एका तरुणाबरोबर पाहून संशयाच्या व अहंच्या जाळ्यात फसलेलं समीरचं प्रेम त्यापुढे निष्प्रभ झालं होतं...