BIG BREAKING जिल्हा पोलीस दलात मोठी खांदेपालट!
शहर ठाण्याचे कर्तव्यदक्ष एपीआय जयसिंग राजपूत आता "एलसीबी' प्रमुख अशोक लांडेंना देणार साथ! कुठे कुठे काय झाले बदल वाचा..
Jul 20, 2024, 10:58 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा पोलीस दलात नव्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची खांदेपालट झाली असून विविध पदावर नेमणूक झाली आहे. यामध्ये बुलडाणा शहर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग राजपूत यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या दुय्यम अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत काही अधिकाऱ्यांची जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली आहे.
श्री जयसिंग राजपूत यांनी तब्बल एक वर्ष बुलढाणा शहर पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाची जबाबदारी पार पडली. विविध प्रकरणांचा सखोल अभ्यास करत त्यांनी कामकाज हाताळले. अभ्यासू, संवेदनशील आणि तितकेच जिगरबाज पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी श्री राजपूत हे मालेगाव नाशिक येथे ५ वर्ष, आदिवासी दुर्गम भागात गडचिरोली सारख्या ठिकाणी ३ वर्ष त्यांनी पोलीस अधिकारी म्हणून सूत्रे सांभाळली. अमरावती ग्रामीणमध्ये ही त्यांनी काम पाहले. असा दीर्घ अनुभव असून आता ते स्थानिक गुन्हे शाखेतील दुय्यम अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारणार आहे.
या पोलीस अधिकाऱ्यांची खांदेपालट!
जिल्हा पोलीस दलामध्ये नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे यांची बुलढाणा शहर येथे नियुक्ती झाली. गणेश इंगोले हे लोणार पोलीस स्टेशनला जाणार आहे. गजानन करेवाड यांच्याकडे मलकापूर शहर ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचा चार्ज दिल्या गेला.
बालाजी शेगपल्लू हे बोराखेडी येथे जाणार आहे, शरद माळी हे बुलडाणा ग्रामीण येथे नियुक्त झाले आहे, तुषार जाधव खामगाव शहर येथे एपीआय म्हणून काम पाहतील, स्वप्निल तायडे यांची चिखली येथे नियुक्ती झाली, नागेश मोहोड जळगाव जामोद येथे नियुक्त झाले तसेच रुपेश शक्करगे हे स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्त करण्यात आले आहे. उपरोक्त सर्व पोलीस अधिकारी बुलढाणा येथे नियंत्रण कक्षात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी कार्यरत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या आदेशाने ह्या नियुक्त जाहीर झाल्या असून तसे पत्रही प्रसिद्ध झाले आहे.