पिंपळगाव सराईच्या जिगरबाज भावांची प्रेरणादायी कथा ! दोघांनी मिळून एकाला सोडविले मृत्यूच्या दाढेतून..! कसे ते बातमीत वाचा...

 
पिंपळगाव सराई (ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) काळ आला होता पण, देवदूताच्या रूपातून दोघे प्रकटले! जन्म आणि मृत्यू कधी आणि कसा? हे विधीलिखितच.. परंतु, इतर कुणाच्या समोर मृत्यू धडकला आणि आपण ते पहातच राहिलो तर हे असंवेदनशील, आणि अमानविय कृत्य समजले जाईल. डोळ्यांच्या समोर कुणावर भीषण संकट ओढावले तर मदतीला धावून जाणे आणि मृत्यूपासून त्याचा बचाव करणे ही जिगरबाज व्यक्तीची खरी संवेदनशीलता! अशाच संवेदनशीलतेचा प्रत्यय पिंपळगाव सराईतील दोन चुलत भावांनी जगासमोर मांडला आहे. 
दहाव्या वर्गात शिकणारा शिवराज गजानन लोखंडे आणि अकरावीतील ऋषिकेश अरुण लोखंडे असे या दोन्ही चुलत भावंडांची नावे. घटना १० जून रोजीची आहे. सुट्टीचे दिवस होते म्हणून शिवराज आणि ऋषिकेश हे दोघेही भाऊ त्यादिवशी शेतीच्या कामात गुंतलेले. पळसखेड शिवारामध्ये साहेबराव गवते यांच्या शेतात ट्रॅक्टरपेरणी यंत्र घेऊन दोघेही पोहोचले. दुपारची वेळ होती, उडीदाची पेरणी करायची होती. म्हणून दोन्ही भावांची लगबग आणि कामाची धावपळ सुरू होती. साहेबराव गवते यांच्या शेतात एक विद्युत प्रवाहित विजेचा खांब होता.
अचानकपणे ऋषिकेश आणि शिवराज यांनी खांबाकडे बघितले तेव्हा त्यांना जे दृश्य दिसले, ते अतिशय थरकाप उडवणारे होते. साहेबराव गवते यांचा मुलगा आकाश (२१ वर्ष) हा विद्युत खांबाला चिकटलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याची जीभ बाहेर पडली.. जोरजोरात तो हातपाय आपटत होता... हे चित्तथरारक दृश्य पाहताच प्रसंगावधान दाखवित ऋषिकेश आणि शिवराज दोघे आकाशच्या जवळ गेले. आकाश याला जोरदार विजेचा झटका बसत होता. यावेळी समय सुचकता आणि चेतनता दाखवून ऋषिकेश व शिवराजने त्याच्या हातावर वाळलेल्या बेशरमीच्या झाडाच्या काड्यांचा मारा केला. हातातील काडीचा वेढा करून दोघांनी त्याला बाहेर ओढले. तेव्हा कुठे आकाश बाहेर फेकल्या गेला. विद्युत खांबापासून त्याची सुटका झाली खरी, पण त्याची प्रकृती अस्थिरच होती. बेशुद्ध अवस्थेत आकाशला उचलून ट्रॅक्टरवर बसवण्यात आले.
कसेबसे त्याला पळसखेड भट पर्यंत ऋषिकेश आणि शिवराज या दोघा भावांनी आणले. त्यानंतर तेथून तातडीने चारचाकी वाहनाने आकाशला चिखलीतील पानगोळे दवाखान्यात भरती करण्यात आले. आधी त्याची प्रकृती अस्थिर होती, तब्बल चार दिवस दवाखान्यात उपचार घेतल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. एकंदरीतच या हृदयद्रावक घटनेतून आकाश साहेबराव गवते याचे प्राण वाचलेत..आणि त्याच्यासाठी देवदूत ठरले ते शिवराज आणि ऋषिकेश हे दोघे भाऊ.. 
 जिगरबाज भावंडांचा शाळेत सत्कार! 
आकाश गवते याची मृत्यूच्या दाढेतून सुटका करणारे दोघेही नात्याने चुलत भाऊ आहेत. ऋषिकेश आणि शिवराज लोखंडे यांचे सर्वत्र कौतुक सुरू असून त्यांनी केलेला प्रताप गावभर सांगण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शाळा सुरू झाल्या. दोघेही पिंपळगाव सराई येथील जनता विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. तर आकाश गवते हा माजी विद्यार्थी आहे. जनता विद्यालयाने लोखंडे बंधूच्या कार्याची दखल घेत त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम शाळेत ठेवला. इतर विद्यार्थ्यांना, त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम पार पडला. शाळेचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी मोठ्या अभिमानाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शिवराज आणि ऋषिकेश या दोघांना २६ जानेवारी २०२५ रोजी शाळेतर्फे शौर्य पुरस्कार दिल्या जाणार असल्याची घोषणा केली.