अमडापूरच्या अमर विद्यालयात माजी विद्यार्थी तब्बल ४५ वर्षानंतर एकत्र, "गुरू कृतज्ञता" सोहळ्याने शिक्षकांचा केला सन्मान! 

 
अमडापुर (गणेश धुंधळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) तब्बल ४५ वर्षानंतर अमडापूर येथील अमर विद्यालयातील माजी विद्यार्थी एकत्रित जमले होते. १९७९ सालच्या बॅचचे हे सर्व विद्यार्थी होते. दरम्यान, सगळ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सन्मानासाठी कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. हा सोहळा भावनात्मक स्वरूपाचा ठरला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजयराव वसंतराव देशमुख होते. तसेच तत्कालीन शिक्षक चीम सर, नापडे सर, वाघ सर, बिडवे सर, खरात सर, खर्चे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान संस्थेचे अध्यक्ष अजय राव देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अमडापूर येथील अमर विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर हे सर्व विद्यार्थी आज विविध क्षेत्रात नावाजलेले आहे. प्रशासकीय, सामाजिक व व्यवसायिक स्तरावर विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटविला आहे. अशी माहिती त्यांनी दिली. तसेच तत्कालीन शिक्षक चिम सरांनी माजी मुख्याध्यापक स्वर्गीय भाऊसाहेब कठोरे यांच्या आठवणी सांगून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत रत्नपारखी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व माजी विद्यार्थी तथा शिक्षकांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमा दरम्यान सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. गुरु कृतज्ञतेचा हा भावपूर्ण सोहळा गुरु शिष्यांच्या नात्यांचे महत्त्व सांगणारा ठरला.