Birthday Special : ...म्हणून आमदार सौ. श्‍वेताताई बनल्या आहेत सामान्यांच्या गळ्यातील ताईत!

 
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाच्या आमदार सौ. श्‍वेताताई महाले पाटील केवळ बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आपल्या लढवय्या स्वभावामुळे परिचित झाल्या आहेत. लोकांच्या प्रश्‍नांसाठी त्या आक्रमक होऊन सरकारशी लढतात, अडचणींत सामान्यांच्या मदतीला धावून जातात... मतदारसंघाला कुटुंब मानणाऱ्या श्‍वेताताईंना नागरिकही घरातील सदस्यच मानतात. कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता ताई मतदारसंघात उपाययोजनांत व्यस्त असल्याचे तेव्हा अवघ्या बुलडाणावासियांनी पाहिले... गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने निसर्गाचा प्रकोप जिल्ह्यावर राहिला आहे. या काळात श्‍वेताताई नेहमीप्रमाणे या शेतकऱ्यांच्या मदतीला धावल्या... वीज प्रश्‍नी महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना धारेवर धरताना त्यांचा आक्रमकपणा पाहून घामाने डबडबलेले अधिकाऱ्यांचे चेहरेही  शेतकऱ्यांनी पाहिले... राजकीय विरोधकांना नामोहरम करण्याची प्रचंड क्षमता, प्रदीर्घ अभ्यास आणि प्रशासनाला सामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मजबूर करणाऱ्या श्‍वेताताई.... सामान्यांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. एका महिला आमदारात हा उत्साह, उमेद, वेळप्रसंगीचा आक्रमकपणा, सामान्य नागरिक, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची कर्तव्य भावना येते कुठून आणि कशी... याबाबत साहाजिकच अवघ्या महाराष्ट्राला कायम कुतूहल राहिलेलं आहे... देशातील सर्वोत्‍कृष्ठ आमदार म्‍हणूनही ताईंचा गौरव सिक्‍स सिग्मा एक्सलन्स अवार्डने त्‍यांना गौरविण्यात आलेले आहे. आज आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने...

मनोज सांगळे, समूह सल्लागार, बुलडाणा लाइव्ह आणि लाइव्ह ग्रुप
अडचण कोणतीही असो नागरिक श्‍वेताताईंना फोन लावायला कचरत नाहीत. कौटुंबिक विषय असो की कुणाचा दवाखाना, शेतीविषयक अडचणी, सरकारी कामकाज श्‍वेताताईंना बिनदिक्कत सांगितल्या जातात आणि विशेष म्हणजे ताईसुद्धा तातडीने त्या समस्येची दखल घेतात आणि मार्गी लावण्यासाठी सरसावतात. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्याला फोन करायला घाबरणारी माणसं ताईंना हक्कानं फोन करून अडचणी सांगतात. कोरोनामुळे अवघ्या जगातील व्यवहार थांबले होते.  अनेक नेते, लोकप्रतिनिधी घरात बसून होते. तेव्हा श्‍वेताताई मात्र सकाळपासून रात्रीपर्यंत मतदार संघ पिंजून काढत होत्या. नागरिकांना धीर देत होत्या. गावांत उपाययोजनांचा आढावा घेत होत्या. अतिवृष्टीमुळे बुलडाणा, चिखली तालुक्यात सातत्याने मोठे नुकसान झाले. काट्याकुट्याचा, चिखलाचा रस्ता तुडवत श्‍वेताताई या काळातही शेतकऱ्यांच्या बांधावर भर पावसात हजर  असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले...

महिला लोकप्रतिनिधी नावालाच नको...
पक्ष, कार्यकर्ते व परिवाराचा पूर्ण पाठिंबा व आत्मविश्‍वासामुळे आपल्याला महिला लोकप्रतिनिधी म्हणून कोणत्याही अडचणी आजपर्यंत आल्या नाहीत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आजही महिला लोकप्रतिनिधी केवळ नावाला व बैठकांना उपस्थिती पतींची, हे चित्र ताईंनी बदललं...

श्‍वेताताई ते आमदार श्‍वेताताई...
नरेंद्र मोदींच्या कार्याने प्रभावित होऊन राजकारणात
मेरा बुद्रूक येथील श्‍वेताताईंचा चिखली तालुक्यातील तोरणवाडा येथील विद्याधर महाले यांच्याशी 2003 साली विवाह झाला. विद्याधर महाले हे सुरुवातीला प्रशासकीय सेवेत बुलडाणा येथे सेवा देत होते. नंतरच्या काळात भाऊसाहेब फुंडकर हे विरोधी पक्षनेते झाल्यावर भाऊसाहेबांचे पीएस म्हणून विद्याधर महाले यांची मुंबई येथे नियुक्ती झाली होती. देशात सत्तापरिवर्तनाचे वारे वाहत होते. गुजरात राज्यात केलेल्या विकासामुळे विकास पुरुष म्हणून नरेंद्र मोदींची प्रतिमा संपूर्ण देशात तयार झाली.

22 डिसेंबर 2013 या दिवशी गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख असलेले नरेंद्र मोदी यांची मुंबईत महागर्जना रॅली होती. मोदींच्या कार्याने प्रभावित झालेल्या ताई त्या सभेला सामान्य नागरिक म्हणून लोकांमध्ये उपस्थित होत्या. हर हर मोदी, घर घर मोदी ही घोषणा देशभर गाजत असताना मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी काम करण्याचा निश्‍चय त्याच दिवशी श्‍वेताताईंनी केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारात व 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार सुरेशअप्पा खबुतरे यांच्या प्रचारात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

पहिली निवडणूक
भाऊसाहेब फुंडकर यांनी आदेश दिल्याने 2017 ची जिल्हा परिषद निवडणूक उंद्री सर्कलमध्ये लढवण्याचा श्‍वेतातार्इंनी निर्णय घेतला. काँग्रेसकडून अरविंदबापू देशमुख यांच्या सारखे तगडे उमेदवार होते. परंतु योग्य नियोजन आणि लोकसंपर्क करून पहिली निवडणूक तब्बल 3200 पेक्षा अधिक मतांनी तार्इंनी जिंकली. जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या काळात उंद्री सर्कलमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, पांदण रस्त्याचा प्रश्‍न, जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचे प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न केले व त्या प्रयत्नांना यशही मिळाले.

आधी राष्ट्र, नंतर पक्ष, त्यानंतर व्यक्ती
राजकारणात राष्ट्रहित सर्वोतोपरी ही भाजपची शिकवण आहे. राष्ट्रहितासमोर पक्ष आणि व्यक्ती नगण्य आहेत. त्यामुळे पहिले राष्ट्र नंतर पक्ष व त्यानंतर व्यक्ती हेच आपल्या सामाजिक व राजकीय जीवनाचे सूत्र असल्याचे ताईंनी बुलडाणा लाइव्हला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते.

मोठ्या मताधिक्क्याने विजयी...
भाजपने विकासकामांची दखल घेऊन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चिखली मतदारसंघातून श्‍वेताताईंना उमेदवारी दिली. काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे यांचा दांडगा जनसंपर्क, निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली व्यूहरचना श्‍वेताताईंसमोर आव्हान बनून होती. मात्र लोकांत काम करण्याचा अनुभव आणि आतापर्यंतच्या विकासामुळे प्रभावित मतदारांनी श्‍वेताताईंना पहिली पसंती दिली. या निवडणुकीत श्‍वेताताई 6810 मतांच्या फरकाने जिंकून आल्या. त्यांना 93515 मते पडली. प्रतिस्पर्धी राहुल बोंद्रे यांना 86705 मते मिळाली.

ही आहे राजकीय महत्त्वाकांक्षा
जनसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राजकारणात आले आहे. समाजाची सेवा करत असताना पक्ष देईल ती जबाबदारी सांभाळण्यासाठी तयार असल्याचे ताईंनी मुलाखतीत सांगितले होते.

घर आणि राजकारण यांना कसा वेळ देतात?
राजकीय जीवनात असताना अनेकदा घराकडे दुर्लक्ष होते. परंतु सासू, सासरे, आई- वडील, पती, भाऊ यांचा आपल्याला भरपूर पाठिंबा असल्यामुळे मी खूप नशीबवान असल्याचे ताईंनी बुलडाणा लाइव्हशी मुलाखतीत सांगितल होतेे. शिवाय संपूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघ आपला परिवार असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.

राजकारणातील मार्गदर्शक
स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनाने ताईंच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चैनसुख संचेती, संजय कुटे तसेच चिखलीतून सतिष गुप्त यांचे वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन लाभले. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अधिकाऱ्यांचा नेहमी सहकार्याचाच अनुभव त्यांना आला. आमदारापेक्षा अधिकारी आपल्याला स्वतःच्या परिवारातील सदस्य समजतात. त्यामुळे काम करताना उत्साह टिकून राहतो, असे श्‍वेताताई मुलाखतीत म्हणाल्या होत्या.


पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट होईल तेव्हा...
अजून श्‍वेताताईंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यक्तीगत भेट झाली नाही. भविष्यात जेव्हा भेट होईल तेव्हा चिखली मतदारसंघातील चिखली शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या, जिल्ह्यातील प्रलंबित असलेला खामगाव -जालना रेल्वेमार्ग, लोणार सरोवराला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ तसेच माता जिजाऊंच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.


ताई राजकारणात आल्या नसत्या तर...
2013 पर्यंत सामान्य गृहिणी म्हणून ताई जीवन जगत होत्या. डी. फार्मपर्यंत शिक्षण झाल्याने मुंबईत खारघर येथे एक डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याची पूर्ण तयारी झाली होती. त्यासाठी डॉक्टरांची अपॉइन्मेंट, इतर परवानग्या ही सर्व प्रकिया पूर्ण झाली होती. परंतु 2013 च्या महागर्जना रॅलीनंतर तो विषय मागे पडल्याचे ताईंनी मुलाखतीत सांगितले होते.

माझ्या परिवारात असताना सुरक्षाव्यवस्थेची काय गरज?
संपूर्ण चिखली मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारात असताना असुरक्षित असल्याचे वाटत नाही. त्यामुळे आपल्याला मिळालेली सुरक्षा जिल्ह्यात कुठेही फिरताना आपण घेत नसल्याचे ताईंनी मुलाखतीत म्हटले होते.

मातृशक्तीला भाजपमध्ये मानाचे स्थान

भाजप हा पक्ष संस्कृती व मूल्य जपणारा पक्ष असल्यामुळे मातृशक्तीला भाजपमध्ये सन्मानाचे स्थान आहे. आजघडीला संसदेत सर्वाधिक महिला खासदार, विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही सर्वाधिक महिला नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्या या भाजपच्याच असल्याचे श्‍वेताताई म्हणाल्या होत्या.

लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान बघून मिळते ऊर्जा...
लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना केलेल्या कामाचा परिणाम म्हणून लोकांच्या चेहऱ्यावर दिसत असलेले समाधान बघून काम करण्याची एनर्जी मिळते. 50 वर्षांच्या एका काकूला गुडघ्याचा त्रास होता. पायाने चालता येत नव्हते. ऑपरेशनचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. तेव्हा 6 ते 7 लाख रुपये खर्च करून त्यांचे उपचार केले. आज त्या काकू स्वतःच्या पायावर चालताना बघून समाधान वाटते, असे ताई मुलाखतीत म्हणाल्या होत्या. भानखेड येथील महादू वाघ यांनी कोळी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या केली. मुलीचे लग्न ठरलेले. घरची परिस्थिती बेताची. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या सभापती असलेल्या ताई व विद्याधर महाले यांनी यांनी महादू वाघ यांच्या मोनिका या मुलीचे कन्यादान केले. लग्नासाठी लागणारा संपूर्ण खर्च उचलून अतिशय धुमधडाक्यात मोनिकाचे कन्यादान करण्यात आले. या लग्नात ताई व त्यांचे पती विद्याधर महाले हे सकाळपासून कन्यादान होईपर्यंत उपस्थित होते. आजही ताई व श्री. महाले मोनिकाकडे स्वतःच्या मुलीप्रमाणे लक्ष ठेऊन असतात.