स्वागत 2021 चे… आनंद अन् उत्साहाला भीतीची लकेर!

नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात झाले. कोरोनाच्या सावटामुळे सार्वजनिक ठिकाणी हा उत्साह साजरा करता आला नसला तरी अनेकांनी शक्य होईल त्या पद्धतीने नववर्ष सेलिब्रेट केलं. आता नवं साल उजाडलं आहे, नव्या सालात काय काय करायचं, गेल्या वर्षी काय झालं आणि त्यातून यंदा काय साध्य करायचं, याचं प्लॅनिंग अर्थात डोक्यात घोळत असणार. याशिवाय नव्या वर्षात एखादा संकल्प …
 

नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात झाले. कोरोनाच्या सावटामुळे सार्वजनिक ठिकाणी हा उत्साह साजरा करता आला नसला तरी अनेकांनी शक्य होईल त्या पद्धतीने नववर्ष सेलिब्रेट केलं. आता नवं साल उजाडलं आहे, नव्या सालात काय काय करायचं, गेल्या वर्षी काय झालं आणि त्यातून यंदा काय साध्य करायचं, याचं प्लॅनिंग अर्थात डोक्यात घोळत असणार. याशिवाय नव्या वर्षात एखादा संकल्प केला जातो, कधी तो पूर्णत्वास जातो, तर कधी वर्ष संपताक्षणीच लक्षात येतं, अरेच्चा आपण हा संकल्प केला होता आणि तो अपुरा राहिला. आपण एखादा संकल्प केला, तर तो ध्यास समजून पूर्ण करण्यास धजावलं पाहिजे. आपण केलेला संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी आपणच पुढाकार घेतला गेला पाहिजे. यंदा गुढी पाडव्यापासून दिवाळीपर्यंत आणि ईदपासून नाताळापर्यंतचे सर्वच सण कोव्हिडच्या सावटाखाली साजरे केले गेले. सार्वत्रिक उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्याचा सुजाणपणा नागरिकांनी दाखविला. संसर्गजन्य साथरोगाचा सामना करण्याचे आलेले हे सार्वत्रिक भान नववर्षाच्या स्वागतातही कायम राहिले ही समाधानाची बाब आहे. 2020 हे वर्ष कोव्हिडची साथ घेऊनच आले असले, तरी जाताना ही साथ तसेच तिच्यामुळे झालेले परिणाम कायम आहेत. साथीची तीव्रता आता कमी होत आहे. प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी उपाय केले जातीलच; शिवाय वैद्यकीय सज्जताही ठेवली जाईल. मात्र, नवीन वर्षातही नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दीर्घ टाळेबंदीमुळे बहुतेक जण आर्थिक अडचणीत आहे. देशात निदान 35 लाख जणांना नोकरी गमवावी लागल्याचा अहवाल सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) दिला आहे. याखेरीज व्यवसाय ठप्प झालेल्यांची संख्या वेगळी. ही परिस्थिती बदलण्यासाठी अर्थव्यवस्था रुळावर येण्याची गरज आहे. त्याकरिता व्यवहार पूर्ववत व्हायला हवेत. उद्योग, कार्यालये सुरू व्हायला हवीत, बाजारपेठा पूर्णपणे खुल्या व्हाव्यात आणि सार्वजनिक वाहतूकही पूर्ववत व्हायला हवी. तसे काही प्रमाणावर होत असल्याने रस्त्यांवरील रहदारी आणि गर्दी वाढली आहे. मात्र, सुरक्षित वावर, मास्क वापरणे आणि स्वच्छता यांचे नियम पाळणे आवश्यक आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठीच्या या उपाययोजना पुढील काही काळ कायम राहणार यात शंका नाही. लस आल्यानंतरही या गोष्टी राहणारच आहेत. त्यांकडे डोळेझाक करणे किंवा त्यांबाबत बेफिकीरी दाखविणे महागात पडू शकते. नवीन वर्षाचे स्वागत करताना मागे वळून पहिल्यास आपण काय कमावलं नि काय गमावलं हे नकळतच पाहावं. अर्थात कोरोनाच्या साथीत गमावलं बरंच काही आहे. त्यामुळे ताळमेळ तर बसणारच नाही. पण नव्या वर्षात सर्व काही सुरळीत होईल असे गृहित धरून वाटचाल अपेक्षित आहे. गेल्या वर्षी न पूर्ण झालेलं स्वप्नं नव्या वर्षात साकारावं. नव्या स्वप्नांना, नव्या आकांक्षांना नव्या वर्षात वाव द्यावा. नवीन विचारांचा वेध घ्यावा, इतकेच नाही तर आपल्याकडील नव्या विचारांनाही नव्या प्रवाहाने गती द्यावी.