बातमी वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल! इस्रोच्या चांद्रयान -३ मोहिमेत जिल्ह्याच्या भूमिपुत्राचा सहभाग; खामगाव तालुक्यातील पातोंडा(पेडका) येथील गणेश भुसारीने सांभाळली रेंज ऑपरेशन ची जबाबदारी! 

आई वडिलांनी काबाडकष्ट करून शिकवले, लोकांच्या घरची धुणी-भांडी केली! पोराने कष्टाचे चीज केले! खामगावात झालेय "आयटीआय"! सध्या सतीश धवन अंतरीक्ष केंद्रात आहे कार्यरत...
 
खामगाव(भागवत राऊत: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मनात आणल तर अशक्य असं काहीच नसत..परिस्थिती कितीही विपरीत असली तरी दुर्दम्य इच्छाशक्ती असेल त्यावरही मात करता येते..हेच दाखवून दिलंय खामगाव तालुक्यातील पातोंडा (पेंडका) या छोट्या खेडेगावातील गणेश भुसारी या तरुणाने..गणेश सध्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो) च्या सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरीकोटा येथे "रेंज ऑपरेशन" विभागात कार्यरत आहे. भारताच्या यशस्वी झालेल्या चांद्रयान-३ मोहिमेत गणेशचाही सहभाग होता. मात्र गणेशचा इथपर्यंत पोहचण्याचा प्रवास सोपा नव्हता...
                   ( जाहिरात👆 )
खामगाव तालुक्यातील पातोंडा (पेंडका) येथे गणेशच्या आई वडिलांची अडीच एकर शेती आहे..या शेतीवरच गणेशच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह..त्यावर भागत नसल्याने आई दुसऱ्यांच्या शेतात कामाला जायची, अनेकांच्या घरची धुणीभांडी करण्याचे कामही गणेशच्या आईने केले. गणेशच्या वडिलांचे खामगावात रेडिओ दुरुस्तीचे छोटे दुकान होते. मात्र रेडिओ कालबाह्य झाल्याने त्यांनाही मजुरीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मात्र हे करीत असताना त्यांनी कधीच मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.
 खामगाव येथील शासकीय आयटीआय कॉलेज मध्ये आयटीआय डिप्लोमा केल्यानंतर गणेशने पॉलिटेक्निक केले. छत्रपती संभाजी नगरातून इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन मधून बी टेक ची पदवी गणेशने प्राप्त केले.त्यानंतर एका खडतर चाचणीला सामोरे गेल्यानंतर २०१९ मध्ये गणेशची इस्रो मध्ये निवड झाली. गणेश सध्या इस्रो मध्ये रेंज ऑपरेशन विभागात कार्यरत आहे. चंद्रयान ३ मोहिमेत देखील गणेशचा सहभाग होता. भारताचे मिशन यशस्वी झाल्याचा आनंद शब्दात सांगता येत नाही असे गणेशने सांगितले. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव मोहिमेच्या इतर मुद्यांवर बोलण्याची मात्र आपल्याला परवानगी नसल्याचे गणेशने विनम्रपणे सांगितले.