शेतकऱ्यांचे भवितव्य ठरविणारी भेंडवळची घटमांडणी आज! पाऊसपाण्याचे वर्तवले जाणार भाकीत! लोकसभेच्या भाकीतावर देखील राजकीय वर्तुळाच्या नजरा...

 
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खरीप व रब्बी हंगामातील पीक परिस्थिती, पाऊस, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी विदर्भासह महाराष्ट्रभर ख्यातीप्राप्त असलेली भेंडवळची घटमांडणी आज १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. त्याचे भाकीत ११ मे ला पहाटे वर्तविण्यात येणार आहे.
पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वीवर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवळच्या मांडणीच्या भाकिताकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. पाऊस, पीक परिस्थिती, राजकीय स्थिती तसेच आर्थिक संकटे याबाबत भाकीते या घटमांडणीतून वर्तविले जातात. त्यामुळे सामान्य जनतेत मांडणीची प्रचंड उत्सुकता असते.
जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णानदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची ही परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षांपासून सुरू आहे. यंदा घटमांडणी १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल. मांडणीचे भाकीत ११ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पूंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे जाहीर करणार आहेत. घटमांडणी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. शेतकरी मोठ्या उत्साहाने या घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित असतात. 
अशी होते घटमांडणी
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बसथांब्याशेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी असे अठरा प्रकारचे धान्य ठेवण्यात येते. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात. पान-सुपारी, पुरी, पापड, सांडोळी-कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे या घटांमध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण केले जाते. त्यानंतर भाकीत वर्तविण्यात येते. यातील बरीच भाकिते खरी ठरल्याचे लोक सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा या मांडणीवर विश्वास आहे. दरवर्षी भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकरी जमतात. भाकीत ऐकून खरीप व रब्बी हंगामात नेमके कोणते पीक घ्यावे, याबाबत शेतकरी आपले नियोजन करतात. 
'राजा'बद्दलच्या भवितव्याची उत्सुकता
भेंडवळच्या घटमांडणीत राजकीय परिस्थितीचे भाकीत करण्यात येते. घटमांडणीत असलेल्या पानविडा व सुपारी यावरून देशाचा राजा कायम राहणार की काही बदल होणार? याबाबत भाकीत करण्यात येईल. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकांना सुरुवात झाली असून ४ जून रोजी निकाल येणार आहेत. तत्पूर्वी राजकीय परिस्थितीबाबत भाकीत वर्तविण्यात येणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागून आहे. मागील वर्षीच्या घटमांडणीत राजा कायम राहणार असल्याचे भाकीत करण्यात आले होते