टाळ-मृदुंगाचा  निनाद, 'गण गण गणात बोते' चा गजर; गजानन महाराजांची पालखी विदर्भात दाखल!  सिंदखेड राजात  हजारो   भाविकांची मांदियाळी!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गण गण गणात बोते'  चा गजर ,टाळ- मृदुंगाचा निनाद,  विठू माऊलीचा जयघोष, भगव्या पताका अन शिस्तबद्ध पद्धतीने चालणारे  वारकरी अश्या थाटा अन दिमाखात विदर्भ पंढरी शेगाव येथील  गजानन महाराजांची पालखी विदर्भ भूमीत दाखल झाली! आज रविवारी दुपारी अडिच वाजताच्या आसपास राजमाता जिजाऊंच्या माहेरी अर्थात ऐतिहासिक सिंदखेड राजा नगरी परिसरात पालखीचे आगमन  झाले.पालखीच्या स्वागत व दर्शनासाठी हजारो  भाविकांची मांदियाळी जमल्याचे दिसून आले.        
 


                      जाहिरात
 आषाढी वारीवर गेलेली पालखीचे कमीअधिक १३००  किलोमीटरचा  प्रवास करून १६ जुलै रोजी रविवारी  सिंदखेडराजा येथे आगमन झाले.  विविध सामाजिक संघटना,  विविध क्षेत्रातील मान्यवर व  भाविकांच्या वतीने पालखीचे विदर्भाच्या प्रवेशद्वारावर पारंपारीक उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले. जिल्ह्याच्या सीमेपासून ते सिंदखेड राजा नगरी पर्यंत ठिकठिकाणी चहा, पेयजल, फराळाची सुविधा करण्यात आली होती. आज रात्री ही पालखी व शेकडो वारकरी विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयात मुक्कामी राहणार आहे. रात्रीच्या भोजनाची व्यवस्था रामेश्वर मंदिर समिती च्या वतीने करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे ५ वाजता ही पालखी किनगाव राजा नगरी कडे प्रस्थान करणार आहे.


  
सोमवारी स्वगृही परतणार..

 १७ जुलै रोजी किनगाव राजा आगमन व बीबी येथे मुक्काम, त्यानंतर १८ जुलै रोजी किनगाव जट्टू व  लोणार येथे मुक्काम, १९ सुलतानपूर, मेहकर येथे मुक्काम, २० जुलै नायगाव दत्तापूर आगमन व  जानेफळ येथे पालखी मुक्कामी राहणार आहे. २१ जुलै वरवंड आगमन व शिरला नेमाने येथे मुक्काम, २२ जुलै विहिगाव आगमन व  आवार येथे मुक्काम आहे.२३ जुलैला खामगाव येथे मुक्कामी राहणार आहे.  खामगाव ते शेगाव दरम्यानच्या अंतिम टप्पात जिल्ह्यासह विदर्भातील हजारो भाविक  पालखी सोबत वारी करतात. ही वारी म्हणजे मोठा उत्सव, सण ठरतो. २४  जुलैला स्वगृही म्हणजे  शेगाव नगरीत  पालखी दाखल होणार आहे.