देऊळगावराजात हिंदू एकतेचे विराट दर्शन; शिवछत्रपतींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भामट्यावर कठोर कारवाईची व शिवभक्तांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी...

 
 देऊळगावराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरामध्ये दि.२ ऑक्टोबर रोजी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. याप्रकरणी काही युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंदू समाजातील युवकांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले असून, ते तत्काळ मागे घेण्याची मागणी करीत सकल हिंदू समाजाच्या वतीने दि. ६ ऑक्टोबर रोजी बंदची हाक दिली होती. या बंदला प्रतिसाद मिळाला असून, शहरातील प्रतिष्ठाने, दुकाने बंद होती. तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पोलिस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांना देण्यात आले. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी समाज बांधवांनी मोर्चाला संबोधीत केले. 
निषेध मोर्चा, घोषणांनी दणाणला परिसर...
 शहरातील श्री बालाजी महाराज मंदिरासमोरील फरसावरून निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली. विविध घोषणाबाजी करीत मोर्चा कमिटी चौक, चौंडेश्वरी मंदिर, चौकातून पुढे संतोष चित्र मंदिराजवळ बस स्थानक चौकात आला.
तेथे समाजातील अनेकांनी भाषणातून रोष व्यक्त्त करीत हिंदू समाजातील युवकांवर दाखल गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, अशी एक मुखी मागणी केली. मोर्चात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.