सोमवारी जिल्ह्यातील २४७२ शाळांची घंटा वाजणार! शिक्षण विभाग सज्ज.. शिक्षणाधिकारी म्हणाले .. 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) पुन्हा विद्यार्थ्यांची किलबील, शाळेतील परिपाठ, अभ्यास आणि गणवेशात तयारी करत विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची लगबग पाहायला मिळणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टया संपत असून, अवघ्या पाच दिवसांनंतर राज्यातील शाळा उघडणार आहे. २०२४ या वर्षात उन्हाची तीव्रता पाहता शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्टया लांबवण्याचा निर्णय घेतला होता. आता १ जुलै, सोमवार पासून राज्यभरातील शाळा उघडणार आहेत. यामध्येच, बुलढाणा जिल्ह्यातील एकूण २४७२ शाळांमध्ये घंटा वाजणार आहे. यामध्ये १४३७ जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.आर.खरात यांनी दिली. आज २५ जून रोजी ते बुलडाणा लाइव्हशी बोलत होते. 
जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळांची स्थिती व्यवस्थित आहे. ज्या शाळांची पडझड झाली होती, त्या पूर्णपणे ठीक करण्यात आल्या आहेत. शाळा उघडण्याच्या पूर्वतयारीची सगळी कामे झाली असून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा पुरविण्यात येणार आहे. शाळांमधून मिळणारे गणवेश, पाठ्यपुस्तके पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. हवे तितक्या शिक्षकांची पूर्तता करण्यात आली आहे. पाहिजे त्या सगळ्या बाबी, परिपूर्ण करण्यात येत असून शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.