तिच्या हाती एसटीच स्टेअरिंग! जिल्ह्यात दोन महिला चालक रुजू!संगीता विष्णू लादे ठरल्या जिल्ह्यातील पहिल्या महिला चालक! मेहकरवरून बस नेली खामगावला
Sep 4, 2023, 14:39 IST
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महिला आजघडीला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. पुरुषांच्या खांद्याला लावून पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर त्याहीपुढचे पाऊल महिला पुढे टाकत आहेत. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या वाहन चालक या क्षेत्रात त्यातही एसटी बसचे चालक म्हणून दोन महिला चालक बुलडाणा जिल्ह्यात रुजू झाल्या आहेत. त्यापैकी एक मलकापूर तर एक मेहकर आगारात रुजू झाल्या आहेत. संगीता विष्णू लादे ( मेहकर) या जिल्ह्यातील पहील्या महीला एसटी चालक ठरल्या आहेत.
वर्षभराचे खडतर ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर संगीता लादे यांनी २ सप्टेंबर ला मेहकर वरून खामगावला बस नेली. आगार व्यवस्थापक संतोष जोगदंडे,सहाय्यक वाहतूक अधीक्षक कृष्णा पवार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक समाधान जुमडे,संजय मापारी, प्रदीप जोशी यांनी संगीता लादे यांचे स्वागत करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. बस मधील प्रवाशांनी देखील लादे यांचे स्वागत केले.