पोलिसांचा ताण वाढणार! जिल्ह्यात महाविकास आघाडी करणार ठिकठिकाणी रास्तारोको;

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी बुलडाण्याकडे जाणाऱ्या बसेस अडवण्याचा आंदोलकांचा प्लॅन! कार्यक्रमासाठी गर्दी जमवायला आयोजकांना यश मिळेल का?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार बुलडाण्यात येत आहेत. प्रशासनाने या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी केली आहे, ३० ते ३२ हजार नागरिकांची बसण्याची व्यवस्था कार्यक्रमस्थळी केली असून  ७१ हजार लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने विविध योजनांचा लाभ देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. मात्र असे असले तरी परवा जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने वातावरण चिघळले आहे, बुलडाण्यातील कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा विविध तालुक्यांतील सकल मराठा समाजाने केली आहे..त्यातच महाविकास आघाडी आज जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको करणार आहे. बुलडाण्याकडे जाणारे सर्वच रस्ते अडवून बुलडाण्यात कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या बसेस अडवण्याचा आंदोलकांचा प्लॅन असल्याचे कळते. एकाच वेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा, महाविकास आघाडीचे आंदोलन, सकल मराठा समाजाचे आंदोलन या सगळ्या आघाड्यांवर बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.  त्यामुळे आयोजकांना कार्यक्रमस्थळी गर्दी जमवायला यश मिळेल का हे पाहणे महत्वाचे ठरेल..!
 

 शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी शासनाने जय्यत तयारी केली आहे. काल विभागीय आयुक्त यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. खा.जाधव यांच्यासह  आमदार गायकवाड , आमदार रायमुलकर हे देखील नियोजनावर लक्ष ठेवून होते. कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना जिल्हाभरातून आणण्यासाठी साडेतीनशे बसेस बुक करण्यात आल्या आहेत. मात्र आता या बसेस कार्यक्रमस्थळी पोहचवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. कारण मराठा आंदोलकांवर जालन्यात झालेल्या लाठीचार्ज च्या निषेधार्थ महाविकास आघाडी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करणार आहे. कालच या रास्तारोकोची घोषणा झाल्याने पोलिसांसमोर ऐनवेळी मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

 दरम्यान या रास्तारोकोत बुलडाण्याकडे जाणाऱ्या बसेस अडवण्याचा आंदोलकांचा प्लॅन असल्याची माहिती आहे. तसे झाले तर लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी पोहचण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आजच्या कार्यक्रमासाठी जिल्ह्याबाहेरून देखील पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली आहे, दंगाकाबु पथक देखील तैनात करण्यात आलेले आहे...मात्र असे असले तरी पोलिसांचा ताण वाढणार आहे...