लग्नात डिजे वाजवायचा? पोलिसांची परवानगी आवश्यक; विना परवाना वाजवल्यास होणार पोलीस कारवाई
Apr 30, 2024, 10:06 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ): लग्न असो वा कुठल्याही शुभ प्रसंगी अथवा मिरवणूक मध्ये वाजविण्यात येणाऱ्या डीजे मुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या डिजे मुळे अनेक ठिकाणी आता कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे बोराखेडी पोलीस प्रशासनाने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. यापुढे लग्न समारंभात डिजे वाद्य वाजवून मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांची रीतसर परवानगी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांनी केले आहे. डिजेचा बेताल आवाज व यावर आक्षेपार्ह गाणे वाजविल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
या संदर्भात काल सोमवार दिनांक २९ एप्रिल रोजी बोराखेडी पोलीस स्टेशन येथे एका बैठकीचे आयोजन करून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. सध्या लग्नसराईची धूम जोरात आहे. या लग्न वरातसह इतर सर्वच मिरवणुकांमध्ये डीजेचा आवाज बेफाम असतो. जवळ डीजे आल्यास शरीर थरथरते. या आवाजासाठी निर्धारित डेसिबलमधे आवाज ठेवणे कायद्यानुसार बंधनकारक असताना त्याचे पालन करताना कोणीच दिसत नाही. एखादा गर्दीचा चौक किंवा मंदिर व मस्जिदसमोर डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजवल्या जातात . यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जातात यातुन दोन गटात वाद होतो. डीजेच्या बेसुमार आवाजामुळे वृद्ध नागरिक व लहान बालकांच्या कानावर व हृदयावर विपरीत परिणाम होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता यापुढे बोराखेडी पोस्टेच्या हद्दीत कोणत्याही गावांमध्ये लग्न वरात मिरवणूक साठी डीजे वाद्य परवानगी न घेता वाजवले व त्यावर आक्षेपार्ह गाणे वाजवून दोन धर्मामध्ये वाद होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास डीजे वाद्य वाहनासह पोस्टेला आणून त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक अशी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बोराखेडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांनी दिली आहे.