बातमी शेतकऱ्यांच्या कामाची! 15 ऑक्टोबरपूर्वी करा "हे" काम; जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली कामाची गोष्ट!
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ई-पीक पाहणीची सुरवात दि. 15 जून 2023 पासून सुरू झाली आहे. आपल्या सातबारावर पिकपेरा स्वत: शेतकऱ्यांनी शेतबांधावर जावून ॲन्ड्राईड मोबाईलद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. ई-पिक पाहणीची नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत दि. 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे. शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी तातडीने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात दि. 27 सप्टेंबर 2023पर्यंत 9 लाख 28 हजार 931 हेक्टर क्षेत्रापैकी 4 लाख 22 हजार 390 हेक्टरक्षेत्रावर, तसेच 6 लाख 51 हजार 411 खातेदारांपैकी 2 लाख 99 हजार 904 खातेदारांनी पिकांची ई-पिक पाहणी व्हर्जन 2.0 या मोबाईल ॲपद्वारे सातबारावर नोंदणी केली आहे. जिल्ह्याची ई-पिक पाहणीची नोंदणी 57.26 टक्के क्षेत्रावर झाली आहे. उर्वरीत क्षेत्रावर ई-पिक पाहणी ॲपद्वारे शेतबांधावर जाऊन पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पिक पाहणीची नोंदणी ई-पिक पाहणी व्हर्जन 2.0 या मोबाईल ॲपद्वारे करताना ॲन्ड्राईड मोबाईल आवश्यक आहे. सदर ॲप गुगल क्रोम अपडेट करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे. ई-पिक पाहणी ॲपद्वारे शेतबांधावर जाऊन पिकाची नोंदणी करून माहिती अपलोड करावी. यासाठी शेतकऱ्याजवळ मोबाईल उपलब्ध नसल्यास किंवा हाताळता येत नसल्यास संबंधित गावाचे तलाठी, तसेच कॉमन सर्व्हीस सेंटरची मदत घेवून पिकांची नोंदणी ई-पिक पाहणी ॲपद्वारे शेतबांधावर जाऊन करावी. ॲपविषयी अडचणी असल्यास तलाठी, कॉमन सर्व्हीस सेंटरची मदत घ्यावी.
ई-पिक पाहणी द्वारे पिकांची नोंदणी दि. 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत केली नसल्यास सातबारावर पिकपेरा कोरा राहणार आहे. यानंतर तो भरता येत नाही. त्यामुळे पीक विमा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडचण निर्माण होईल. अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीबाबत विमा क्लेम करायचे असल्यास सातबारावर अचूक पिक नोंद आवश्यक आहे.
ई-पिक पाहणी ॲपची लिंक play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova ही असून गुगल ॲप स्टोअरद्वारे सदर ॲप इन्स्टॉल करावे. या ॲपद्वारे दि. 15 ऑक्टोबर 2023 पूर्वी पिकांची नोंदणी शेतबांधावर जाऊन करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.