बातमी बेरोजगारांसाठी! व्यक्तिगत व्यवसायासाठी मिळेल १५ लाखांचे कर्ज! गटकर्ज मिळेल ५० लाखापर्यंत! व्याज शासन भरणार; काय आहेत अटी, कसा करायचा अर्ज...बातमीत वाचा..
बुलडाणा( जिल्हा माहिती अधिकारी):मराठा समाजातील बेरोजगार युवकांमध्ये उद्योजकता वाढावी, यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे विविध व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात येते. यात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या कर्जदारांना कर्जावरील व्याजाचा परतावा देण्यात येतो.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे आर्थिक मागास प्रवर्गातील बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य व्हावे, यासाठी व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात येते. महामंडळाने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता अभियानातून मराठा समाजातील युवक-युवतींना व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे शेतीपूरक व्यवसायासोबत सेवा, उत्पादन, व्यापार आणि विक्री आणि ट्रॅक्टर व्यवसायासाठीच्या कर्जावर व्याज परतावा देण्यात येतो.
महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत १५ लाख रूपयांपर्यंत, तसेच गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत ५० लाखापर्यंत १२ टक्केच्या मर्यादेत कमाल ७ वर्षासाठी व्याज परतावा देण्यात येतो.
पात्रतेचे निकष काय?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी राज्याचा रहिवासी असावा. वयोमर्यादेची अट महिला व पुरुष दोघांसाठीही १८ ते ६० वर्षे आहे. लाभार्थींना महामंडळाचे संकेतस्थळ udyog.mahaswayam.gov.in यावर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. व्याज परतावा महामंडळाकडून थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक युवकांनी आपले विविध प्रकारचे व्यवसाय उभे केले आहेत. लाभार्थी नियमित हप्ते भरत असल्यास त्यांना व्याज परतावा देण्यात येतो. जिल्ह्यातील युवकांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, आवश्यक असल्यास अण्णासोहब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाशी संपर्क करावा.