बुलडाण्यात १३ सप्टेंबरला घोंगावणार मराठा क्रांती मोर्चाचे वादळ! मार्ग व सभास्थळ निश्चित; जिल्हा मुख्यालय होणार भगवेमय! शाळकरी मुली करणार नेतृत्व..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मराठा आरक्षण आणि जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध बुलडाणा जिल्ह्यातील मराठा समाज बांधव नोंदविणार आहे.या साठी बुलढाणा येथे १३ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा निघत आहे. प्रशासनासोबत दीर्घ चर्चेअंती मोर्चाचा मार्ग, सभास्थळ ड्रेस कोड, पार्किंग व्यवस्था, पाण्याचे नियोजन आदी नियोजन पार पडले असून जिल्ह्याच्या तेराही तालुक्यातून मोर्चेकरी बुलढाणा जिल्हा मुख्यालयी येणार असल्याने प्रशासनाची धावपळ वाढली आहे. प्रशासन व समन्वयकांच्या बैठकीत मोर्चाला अंतिम रूप आज देण्यात आले.
 जाहिरात  👆
मराठा समाजात आर्थिक दुर्बलतेचे प्रमाण अधिक असल्याने मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा अलीकडे पुढे आला आहे. यासाठी यापूर्वीही प्रचंड मोर्चे राज्यभर निघाले. हीच मागणी आजही कायम असल्याने मराठा आरक्षणाची तीव्रता शासन प्रशासनाच्या निर्देशास आणून देणे व जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा येथे १३ सप्टेंबर रोजी भव्य मराठा मोर्चाचे आयोजन आहे.
 असा राहणार मार्ग
 जिजामाता प्रेक्षागार या ठिकाणी मोर्चेकरी जमनार आहे.शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा मार्गक्रमण करेल. संगम चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना सामूहिक अभिवादन करून जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक ....असा रूट निर्धारित करण्यात आला आहे.
 शाळकरी मुली करणार नेतृत्व
 निवेदन देण्यासाठी दहा शाळकरी मुलींची निवड करण्यात आली असून काळ्या पोशाख परिधान केलेल्या मुली जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे. मोर्चाला संबोधित करण्यासाठी लागणारे स्टेज एका ट्रेलरवर राहणार आहे .यासाठी भव्य ट्रेलर ची निवड करण्यात आली आहे. सभास्थळी प्रचंड गर्दी होणार असल्याने दूर दूर पर्यंत आवाज पोहोचण्यासाठी ध्वनीक्षेपणाची चोख व्यवस्था देखील करण्यात आली आहे. याचे नियोजन बैठकीत पार पडले.
 भगवी लाट येतेय
शिवरायांचे भगवे ध्वज मुख्य मार्गावर लावण्यासाठी खामगाव येथून हजारो ध्वज बोलविले आहे. ठिकठिकाणी स्लोगन व फ्लेक्स बोर्ड देखील लावले जात आहे. ग्रामीण भागातून येणारे मोर्चेकरी यांना योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी स्वयंसेवकाची टीमही तयार करण्यात आली आहे. ठिकठिकाणी भगवा फडकणार असल्याने अवघे शहर भगवे मय होणार आहे.मोर्चासाठी तरुण मुले ,मुली, स्त्री, पुरुष सर्वांनी कौटुंबिक हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 फेसबुक पेज देखील उघडले..
 आंदोलनाची रूपरेषा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी सहज आणि सोपे माध्यम म्हणजे सोशल मीडिया... सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चाचे ऑफिशियल फेसबुक पेज उघडण्यात आले आहे.या ठिकाणी भेट दिल्यास आगामी रूपरेषा व नवीन माहिती मिळणार आहे.या पेजला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.