जिल्ह्यात ४ तालुक्यांत अतिवृष्टी! शेगाव, मलकापूर, संग्रामपूर, जळगाव जामोदला धो धो धुतले; नांदुऱ्यात म्हशीचे दूध काढताना भिंत अंगावर पडल्याने पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर
Jul 19, 2023, 14:36 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जून आणि जुलैच्या अर्ध्यापर्यंत तरसायला लावणारा पाऊस आता मात्र धो धो कोसळायला सुरुवात झाली आहे. १८ जुलैच्या रात्री जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस पडला, वृत्त लिहीत असताना देखील अनेक ठिकाणी पाऊस बरसत आहे. दरम्यान रात्री जिल्ह्यातल्या ५ तालुक्यांना पावसाने अक्षरशः धुवून काढले. नदी नाल्यांना पूर आला, काही गावांत नाल्याचे पाणी शिरले. पावसामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असले तरी नांदुरा तालुक्यातील एका घटनेने मात्र आनंदात विरजण पडले आहे.
नांदुरा तालुक्यातील मामुलवाडी येथे भिंत कोसळल्याने त्याखाली दबून एकाचा मृत्यू झाला. प्रताप नामदेव गावंडे(५०) असे मृतकाचे नाव आहे तर त्यांचा मुलगा शुभम (२४) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघे पिता पुत्र म्हशीचे दूध काढत असताना रात्रीच्या पावसाने भिजलेली त्यांच्या अंगावर कोसळली.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त अहवालानुसार शेगाव तालुक्यात सर्वाधिक ९१ मिमी पाऊस पडला. जळगाव जामोद तालुक्यात ८४.५मिमी, संग्रामपूर तालुक्यात ७६ मिमी, मलकापूर तालुक्यात ७५.३ मिमी तर नांदुरा तालुक्यात ५५.६ मिमी एवढा पाऊस पडला आहे.