शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! जिल्हा कृषी हवामान केंद्राने सांगितला पावसाचा अंदाज; २६ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात कसे असेल हवामान? जाणून घ्या...
Aug 22, 2023, 19:34 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या आठवड्यात १८ ,१९,२० या तीन दिवसात जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोयाबिनला शेंगा लागण्याची ही वेळ असल्याने पावसाची गरज होती, ऐनवेळी पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे. अशातच आता २६ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज जिल्हा कृषी हवामान केंद्राने वर्तविला आहे.
जिल्ह्यात घाटाखालील मोताळा, खामगाव वगळता उर्वरित तालुक्यांत गेल्या महिन्यात अतिवृष्टी झाली होती. मात्र घाटावर अजूनही समाधान कारक पाऊस झाला नव्हता. मात्र गेल्या आठवड्यात ३ दिवस बऱ्यापैकी पाऊस झाला. आता २२ ते २५ ऑगस्ट या दरम्यान काही ठिकाणी तर २६ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी माहिती जिल्हा कृषी हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ मनिष येदुलवार यांनी दिली आहे.