गणेशमंडळांच्या देखाव्यांतून अधोरेखित होणार जिल्ह्याची गौरवशाली परंपरा! वन बुलडाणा मिशनचे "बुलडाणा गौरव गणेश अभियान"! विजेत्यांना मिळणार १ लाखापर्यंत आकर्षक बक्षिसे..

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): यावर्षीचा गणेशोत्सव जिल्ह्यासाठी खास ठरणार आहे. गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी वन बुलढाणा मिशनच्यावतीने बुलढाणा गौरव गणेश अभियान राबवण्यात येणार आहे. गणेश मंडळे, घरगुती गणपतीसमोरील देखाव्यांतून जिल्ह्याची गौरवशाली परंपरा अधोरेखित केली जाणार आहे. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्राचे लाडके दैवत, बुद्धीची देवता गणरायाचे १९ सप्टेंबर रोजी आगमन होत आहे. दहा दिवस घरोघरी गणपती बाप्पांचा मुक्काम राहील. अनंत चतुर्दशीला म्हणजे २८ सप्टेंबर रोजी लाडके बाप्पा निरोप घेणार आहेत. गणेशोत्सव सर्वांसाठीच एक पर्वणी असते. सर्वत्र अध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण बघायला मिळते. दररोज आरती, भजन, भक्तिगीते, संगीताचे मंजुळ स्वर कानी पडतात. लाडक्या गणरायासाठी घरोघरी नैवैद्य, मोदक, गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. आरती, पुजा, सजावट, नवनवीन वस्त्रासह भक्तिमय पाहुणचार गणरायाला दिला जातो. दहा दिवसानंतर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.  

यंदा वन बुलढाणा मिशन जिल्ह्यातील गणेश भक्तांसाठी बुलढाणा गौरव गणेश अभियान घेऊन आले आहे. यामाध्यमातून कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळेल. गणेश मंडळे आणि घरगुती गणपतींसमोरील देखाव्यांचे कलात्मक कार्य संपूर्ण जिल्ह्यासमोर झळकवण्यात येणार आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवातील हे अभियान स्पेशल ठरणार आहे. 

जिल्ह्याला गणेशोत्सवाची जुनी परंपरा

बुलढाण्याच्या गणेशोत्सवातील देखाव्यांना एक परंपरा आहे, इतिहास आहे. दरवर्षी जिल्ह्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो. गणेश मंडळे, घरगुती गणपतींसमोर विविध देखावे साकारले जातात. देखावे केवळ पाहण्यासाठी नसून अभ्यासाचा विषय आहे. याच उद्देशाने वन बुलढाणा मिशनकडून बुलढाणा गौरव गणेश अभियान राबवण्यात येत आहे. सामाजिक, ऐतिहासिक, अध्यात्मिक, कृषी, क्रीडा, साहित्य, कला, राजकारण, पर्यावरण, शिक्षण यासह ताज्या घडामोडी, ज्वलंत विषय देखाव्यातून मांडता येऊ शकतात. 


असा घेता येईल सहभाग

बुलढाणा गौरव गणेश अभियानात सहभाग घेणे अगदी सोपे आहे. आपल्या जिल्ह्याची गौरवशाली परंपरा अधोरेखित करणाऱ्या देखाव्याचा फोटो किंवा व्हिडीओ आपणास पाठवायचा आहे. अधिक माहितीसाठी ७८९८९८४०९८ या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.  सार्वजनिक गणेश मंडळ आणि घरगुती गणपती दोन्हींसाठी हे अभियान आहे. विजेत्यांना १ लाखापर्यंत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.