ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट; विजेचा शॉक लागून बैलजोडी दगावली! देऊळगावराजा तालुक्यातील तुळजापूरची घटना..
Jun 5, 2024, 19:58 IST
देऊळगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) खांबावरील विजेचा शॉक लागून बैलजोडी ठार झाल्याची घटना आज ५ जून रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापुर येथे उघडकीस आली.
येथील शेतकरी सचिन कोल्हे शेतातील मशागतीची कामे करत होते. तत्पूर्वी रात्री बरसलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील विजेच्या खांबात विद्युत प्रवाह सुरू होता. दरम्यान, शेतातील बैलजोडी खांबाजवळ आली. अचानकपणे दोन्ही बैलांचा स्पर्श धोकादायक विजेच्या खांबाला लागल्याने जबर शॉक बसला. विजेच्या तीव्र झटक्याने बैल जोडी जागीच ठार झाली. यावेळी बैलजोडी वाचवण्यासाठी शेतकरी सचिन कोल्हे यांनी प्रयत्न केला तर त्यांनाही झटका बसला. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतातील बैलजोडी दगावली. यामुळे जवळपास दीड लाखांचे नुकसान झाले आहे. शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.