जुन महिना संपला तरी जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा कायम! तब्बल २ लाख नागरिकांची तहान टँकरवर..
Jun 29, 2024, 13:46 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जून महिना संपत आला तरी जिल्ह्यातील ७४ गावांमध्ये अजूनही पाणी पेटले आहे. धरणे, छोटे-मोठे प्रकल्प महिन्याभराच्या पावसात उपाशीच राहिल्याचे चित्र आहे. जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. तब्बल दोन लाख नागरिकांची तहान टँकरवर अवलंबून असल्याचे भीषण वास्तव आहे.
Advt.👆
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जून महिन्यात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. काही ठिकाणी कोसळधार झाला असला तरी, प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढलेली नाही. अर्थात पावसाचा वेग जास्त होता, वेळ नाही. जिल्ह्यातील ७४ गावांमध्ये ८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याची माहिती आहे. दरम्यान, पावसाची आशा ठेवून बहुसंख्य शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण पाहिजे तसा पाऊस नसल्याने जमिनीमध्ये ओल वरवरची झाली. त्यामुळे, शेकडो शेतकरी नैराश्याच्या गर्तेत सापडलेत. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी देऊळगाव राजा, चिखली, मेहकर, बुलढाणा, मोताळा, लोणार, सिंदखेडराजा या ७ तालुक्यांमध्ये ८१ टँकरद्वारे विविध गावात पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये तब्बल २ लाख २० हजार ८२९ नागरिकांची तहान टँकरवरच अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. शिवाय,२९१ गावांमध्ये पाण्याच्या समस्येचे निराकरण करत ३४९ इतक्या विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.