भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अधिक व्यापक! शेतकऱ्यांना मिळणार सेंद्रिय व रासायनिक खते
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली फळबाग योजना अधिक प्रभावी व व्यापक बनविण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या योजनेत काही आवश्यक बदल करण्यात आले आहेत. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत आता शेतकऱ्यांना सेंद्रिय व रासायनिक खते मिळणार आहेत. तसेच या योजनेच्या अनुदानातही सुधारणा करण्यात आली असून या बदलास राज्य शासनाच्यावतीने मान्यता देण्यात आली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केवळ जॉब कार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीकरिता २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. मात्र राज्यामध्ये ८० टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही त्यांच्याकडे जॉब कार्ड नसल्याकारणाने ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीकरिता अनुदान मिळण्यास अपात्र ठरत होते. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्यात सन २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास ६ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीसाठी अनुदान केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय योजना प्रति थेंब अधिक पिक या योजनेतून अदा करण्यात येते. मात्र शेतकऱ्यांना इतर योजनांमधुन ठिबक सिंचन संचाचा लाभ होत असल्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे या बाबी ऐवजी खते देणे ही बाब समाविष्ट करण्याची तसेच सुधारित केलेल्या मापदंडांना मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्य शासनाने काही निर्णय घेतले आहेत. यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये सन २०२३- २४ पासून काही बदल करण्यात आले आहेत.
त्यात सन २०२३- २४ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे' या बाबी ऐवजी 'रासायनिक व सेंद्रीय खते देणे ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शासन अनुदानीत बाबींच्या प्रती हेक्टरी सुधारित मापदंडांना मंजूरी देण्यात आली आहे. यापूढे जिवंत झाडांचे प्रमाण निश्चित केल्यानुसार प्रमाणात दिसुन आल्यास लाभार्थीना देय असणारे अनुदान तीन वर्षांत ५०:३०:२० या प्रमाणात न देता अंदाजपत्रकामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षामध्ये देय दर्शविण्यात आलेल्या अनुदानाप्रमाणे देण्यास मान्यता देण्यात आली आहे. उपरोक्त प्रमाणे योजनेंतर्गत केलेले बदल व सुधारित मापंदड सन २०२३ २४ पासून लागू राहतील. त्याप्रमाणे कृषी आयुक्त यांनी क्षेत्रीय यंत्रणेस योजनेच्या अंमलबजावणीकरिता सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात असेही निर्देश देण्यात आले आहेत.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : आमदार आकाश फुंडकर
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील नवीन सुधारणांमुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात हातभार लागणार असून शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे. त्यामुळे या योजनेचा सर्व पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आ. आकाश फुंडकर यांनी केले आहे. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी तात्काळ याबाबतचे माहिती पत्रक काढून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याबाबत मदत करावी, अशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत.