“स्टे’च्या सावटात धाड सरपंचपदाची उद्या निवडणूक! स्थगिती शस्त्र नाही मिळाले तर “कोरम’चे शास्त्र वापण्याचे डावपेच? राजकीय हालचालींना वेग

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः न्यायालयीन स्थगितीच्या धामधुमीत बुलडाणा तालुक्यातील धाडच्या सरपंचपदाची निवडणूक येत्या 27 सप्टेंबर रोजी होणार असून, ती सध्यातरी बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसकडून स्थगितीचे शस्त्र वापरण्यासाठी कसोशीने प्रयत्न होत असून, ते नाही जमलेच तर कोरमचा पर्याय वापरण्याचे डावपेच आखण्यात आले आहेत. दुसरीकडे कट्टर विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस गटाने सहकारी पक्षांसह …
 

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः न्यायालयीन स्थगितीच्या धामधुमीत बुलडाणा तालुक्यातील धाडच्‍या सरपंचपदाची निवडणूक येत्या 27 सप्टेंबर रोजी होणार असून, ती सध्यातरी बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसकडून स्थगितीचे शस्त्र वापरण्यासाठी कसोशीने प्रयत्न होत असून, ते नाही जमलेच तर कोरमचा पर्याय वापरण्याचे डावपेच आखण्यात आले आहेत. दुसरीकडे कट्टर विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस गटाने सहकारी पक्षांसह काहीही करून सरपंचपद पटकावण्याची जिद्द बाळगली आहे. तसेच आपले सदस्य सुरक्षित ठेवण्यावर भर दिल्याचे वृत्त आहे. यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.

27 तारखेला दुपारी 2 वाजता ग्रामपंचायत भवनात सरपंच निवडीच्या विशेष सभेला सुरुवात होणार आहे. तहसीलदार रुपेश खंडारे यांनी सर्वोतोपरी दक्षता घेत नियोजन करीत सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी जी. टी. राऊत यांची नियुक्ती केली आहे. या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होताच स्थगिती आणण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या. काँग्रेस अर्थात रिजवान सौदागर गटाच्या सूत्रधाराने सध्या जरी स्टे ऑर्डर मिळाली नसली तरी उद्या सोमवारी तो मिळण्याची दाट शक्यता बोलून दाखविली. यात अपयश आलेच तर उद्याच्या निवडणुकीत कोरम चा पर्याय वापरण्याचे डावपेच आखण्यात आल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.

बलाबल, कोरम अन्‌ गुंतागुंत…
दरम्यान, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अति संवेदनशील असलेल्या धाड गावा सारखीच मजेदार अन्‌ गुंतागुंतीची ग्रामपंचायतीची “इस्टोरी’ आहे. माजी आमदार राहुल बोंद्रे व हर्षवर्धन सपकाळ यांच्या खास मर्जीतील धूर्त युवा नेता ही सौदागर यांची ओळख. एकूण सदस्य 17 आहेत. त्यात (रिजवान )काँग्रेसचे 9 सदस्य आहेत. खातूनबी सय्यद गफ्फार या सरपंच म्हणून अपात्र ठरल्या असल्या तरी त्यांचे सदस्यत्व कायम आहे. विरोधी राष्ट्रवादी आघाडीचे एकूण बलाबल 8 इतके आहे. पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांचे पाठबळ ही त्यांची ताकद. याशिवाय गटात काँग्रेसचा एक सदस्य आहे, हे विशेष. यावर कळस म्हणजे त्यांच्यासोबत भाजपचे 4, राष्ट्रवादीचे 2 अन्‌ सेनेचा 1 सदस्य आहे. यामुळे गटाला विद्यमान आमदारांचेही पाठबळ असणे ओघानेच आले! राजकीय गुंतागुंत किती टोकाची हे यावरून स्पष्ट होते.

नियमानुसार 17 पैकी 9 सदस्य उद्याच्या सभेला हजर राहणे आवश्यक आहे. यामुळे स्टे जमलाच नाही तर काही तासांपुरता तरी काँगेस पुढे कोरमचा पर्यायच उरतो. यामुळे गटाचे 9 सदस्य गायब राहिले, तर नियमानुसार सभा बारगळते! तसा नियमच आहे. मात्र अशी रद्द झालेली सभा लगेच दुसऱ्या दिवशीच घ्यावी लागते अन्‌ मग त्याला कोरमचे बंधन नसते. या मजेदार राजकीय पेच, गुंतागुंत, स्टेची आतुर प्रतीक्षा, राजकीय दबाव, हालचाली या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी काय होते याकडे धाडच नव्हे चिखली मतदारसंघासह प्रशासकीय वर्तुळाचे देखील लक्ष लागले आहे. कारण ही ग्रामपंचायत हायकोर्ट ते जालना एसडीओ, जात पडताळणी समितीपर्यंत पोहोचली आहे. एरवी केवळ राष्ट्रवादीकडेच एससी संवर्गातील सदस्य असल्याने (सावित्री सत्यवान बोर्डे) असल्याने त्यांची अविरोध निवड झाली असती. पण सर्व सरळ झालं तर ती धाड ग्रामपंचायत अन्‌ धाडचे राजकारणच कसे?