सिंदखेड राजाच्‍या विकासावर मंत्रालयात पार पडली बैठक!; पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पुढाकार, निधी कमी पडू देणार नसल्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्‍वाही

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा अन् मातृतीर्थला दिलेल्या भेटीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेला पुढाकार याचा परिणाम म्हणून आज, ७ ऑक्टोबरला सिंदखेडराजासह अन्य पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खा. सुप्रिया सुळे, पालकमंत्री राजेंद्र शिंगणे …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा अन्‌ मातृतीर्थला दिलेल्या भेटीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेला पुढाकार याचा परिणाम म्‍हणून आज, ७ ऑक्‍टोबरला सिंदखेडराजासह अन्य पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खा. सुप्रिया सुळे, पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी, अशी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलेली विनंती दोघांनीही मान्य केली. पर्यटन विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या स्थळाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इथे १६ पर्यटनस्थळे आहेत. त्यापैकी पाच स्थळे केंद्राच्या अखत्यारितील पुरातत्व विभागाकडे आहेत.

शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे माहेर म्हणून हे स्थळ ओळखले जाते. याशिवाय लखोजी राव यांचा राजवाडा, रंगमहाल, निळकंठेश्वर मंदिर यांसाख्या स्थळांमुळे अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात. पर्यटन विकासासह वारसा जतन करण्यासाठी लागणारे सहकार्य पुरातत्व विभागाला करण्यात येईल, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली. २५ सप्टेंबरला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे भेट देऊन सर्व स्थळांची पाहणी केली होती होती.