रोखठोक : टोकाची असंवेदनशीलता!!; खासदार, आमदारांना साधे दुःखही व्‍यक्‍त करता आले नसल्याने जिल्हावासियांना सखेद आश्चर्य!; १३ बळी आपले मतदार नव्‍हते म्‍हणून???

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगावजवळ टिप्पर उलटून १३ मजुरांचा काल २० ऑगस्टला मृत्यू झाला. या घटनेबद्दल पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे वगळता अन्य कोणत्याही आमदार, जिल्ह्याच्या खासदारांना दुःख वाटू नये, त्यांच्याकडे शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी दोन शब्दही नसावेत याबद्दल जिल्हावासियांना आश्चर्य वाटत आहे. हे मजूर आपल्या जिल्ह्यातील नव्हते, त्यामुळे ते आपले मतदार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्‍यातील तढेगावजवळ टिप्पर उलटून १३ मजुरांचा काल २० ऑगस्‍टला मृत्‍यू झाला. या घटनेबद्दल पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे वगळता अन्य कोणत्‍याही आमदार, जिल्ह्याच्‍या खासदारांना दुःख वाटू नये, त्‍यांच्‍याकडे शोकसंवेदना व्‍यक्‍त करण्यासाठी दोन शब्‍दही नसावेत याबद्दल जिल्हावासियांना आश्चर्य वाटत आहे. हे मजूर आपल्या जिल्ह्यातील नव्‍हते, त्‍यामुळे ते आपले मतदार नाहीत म्‍हणून त्‍यांच्‍याबद्दल दयाभाव नेत्‍यांना वाटला नसेल का, असा प्रश्नही व्‍यक्‍त केला जात आहे. स्‍थानिक नेत्‍यांचेच काय पण राज्‍याच्‍या मुख्यमंत्र्यांनाही या घटनेची दखल घ्यावीसी वाटली नाही हे विशेष. दुसरीकडे मध्यप्रदेशच्‍या मुख्यमंत्र्यांनी मात्र घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने आपल्या अधिकाऱ्यांना बुलडाणा जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवून मृतकांच्‍या कुटुंबियांच्‍या मदतीबद्दल सूचना केल्या. हेच मजूर बुलडाणा जिल्ह्यातील असते तर श्रेय घेण्यासाठी, मदतकार्यासाठी आपल्या नेत्‍यांनी, लोकप्रतिनिधींनी किती आटापिटा केला असता, अशी भावनाही व्‍यक्‍त होत आहे.

सध्या जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. तढेगावजवळ या कामासाठी आलेल्या मजुरांचे तात्‍पुरते निवासस्‍थान आहे. तिथून काल टिप्परमध्ये बसून १५ मजूर कामाच्‍या ठिकाणी गेले, मात्र पावसामुळे काम बंद असल्याचा निरोप मिळाल्याने परत फिरले. मात्र परतताना एसटी बसला वाचविण्याच्‍या प्रयत्‍नात रस्‍त्‍याखाली येत टिप्पर उलटले. यात १३ मजूर ठार झाले. स्‍थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. पोलीस प्रशासनाने घटनास्‍थळी पोहोचून जखमींना रुग्‍णालयात पाठवले तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणून त्‍यांची ओळख पटवणे सुरू केले. पण एरव्‍ही छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी, अपघातासाठी धावून जाणारे नेते, लोकप्रतिनिधी मंडळी कुठेच दिसली नाहीत. मजूर मध्यप्रदेशातील आहेत, ही माहिती सर्वांत आधी “ब्रेक’ झाली तेव्‍हा कदाचित त्‍यांच्‍यातील “उत्‍साह’ मावळला असावा, अशी प्रतिक्रिया काल बुलडाणा लाइव्हच्‍या टीमकडे मदतकार्यातील लोकांनी व्‍यक्‍त केली. मृत मजुरांच्या नातेवाइकांचे अश्रू, आर्त किंकाळ्यांनी उपस्थितांच्‍या हृदयाला पाझर फुटला. अधिकाऱ्यांचाही कंठ दाटून आला. मात्र थातूरमातूर होणाऱ्या विकासाचेही श्रेय लाटण्यासाठी धडपडणाऱ्या लोकप्रतिनिधींना या घटनेचे सोयरसुतक नव्‍हते. केवळ मतदानावर परिणाम नाही म्‍हणून दुःखही आटले की वाटलेच नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्‍या नातेवाइकांचे अश्रू विरून जातील, कुणाच्‍या मदतीशिवाय ते जगायला नव्या उमेदीने उभेही राहतील, पण आपल्या जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह तमाम लोकप्रतिनिधींची (पालकमंत्री वगळता) ही टोकाची असंवेदशीलता जिल्हावासिय विसरतीलच असे नाही.